उरण : कफ नगर पनवेल येथील हर्षनिती हाऊसिंग सोसायटीचा रहिवासी कु. अनुज अनंत पाटील याने नुकत्याच जाहीर झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट (C.A.) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले असून,परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.कु.अनुज पाटील हे रोमिता अनंत पाटील आणि अनंत कृष्णा पाटील यांचे सुपुत्र असून,पाटील कुटुंबाचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील गडब (ता.पेण) हे आहे. हे दांपत्य उच्चशिक्षित असून,विवाहानंतर पनवेल येथे स्थायिक झाले. “हम दो, हमारे दो” असा संतुलित विचार स्वीकारत त्यांनी आपल्या दोन मुलांच्या शिक्षणाला आणि प्रगतीला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे.
या कुटुंबातील धाकटा मुलगा अमेय पाटील सध्या नेरूळ येथील S.I.E.S. कॉलेजमध्ये बी.एम.एस. (Bachelor of Management Studies) हा अभ्यासक्रम करत आहे. तर थोरला मुलगा अनुज लहानपणापासूनच शांत,नम्र व अभ्यासू विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. शालेय जीवनात तो सदैव हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत अग्रस्थानी राहिला असून,दहावीच्या परीक्षेत त्याला तब्बल ९० टक्के गुण प्राप्त झाले होते.
अनुजच्या वडिलांची इच्छा होती की तो वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर व्हावा,परंतु अनुजने स्वतःच्या आवडीने आणि दृढ निश्चयाने कॉमर्स शाखा निवडून सी ए बनण्याचा निर्णय घेतला. “आपल्या परिचयातील कोणीही सी ए केलेले नाही,” असे पालकांनी सांगूनही अनुजने हार न मानता,जिद्दीने या क्षेत्रात पाऊल ठेवले.
बारावीच्या परीक्षेत ८९ टक्के गुण मिळवत अनुजने सी ए अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. अभ्यासादरम्यान कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षणाच्या अडचणींवर मात करत,त्याने स्वतःचा अभ्यासक्रम पूर्ण केला. सततच्या प्रयत्नांनी व स्वअनुशासनाच्या बळावर त्याने सी ए इंटर तसेच सी ए फायनल या दोन्ही परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या सी ए फायनल परीक्षेत अनुजने उत्तम गुणांसह यश संपादन केले.
या यशानंतर पनवेलमधील हर्षनिती हाऊसिंग सोसायटीत आनंदाचे वातावरण पसरले. पाटील दांपत्याने सोसायटीतील रहिवाशांना पेढे वाटून मुलाच्या यशाचा आनंद व्यक्त केला. तसेच गडब गावातील पाटील कुटुंब आणि कोन गावातील घरत परिवार यांच्याही घरी उत्साहाचे वातावरण होते. दिवसभर नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून अनुज व त्याच्या पालकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत होता.अनुज पाटीलचे हे यश केवळ पाटील कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण पनवेल परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे.जिद्द,सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अशक्य ते शक्य करून दाखवणाऱ्या अनुजचे सर्वत्र कौतुक होत आहे.