सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अजितदादांच्या मुलावर जमीन घोटाळ्याचा आरोप, आता देवेंद्र फडणवीसांनी प्रकरणाची माहिती मागवली; पार्थ पवारांच्या अडचणी वाढणार?
 व्यक्ती विशेष

मोठी बातमी : जमीन घोटाळ्याच्या भोवऱ्यात पार्थ पवार; विरोधकांचा हल्लाबोल, पार्थ पवारांचं एकच उत्तर!

डिजिटल पुणे    06-11-2025 12:45:41

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका जमीन खरेदी व्यवहारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया होल्डिंग्स एलएलपी ही कंपनी चर्चेत आली आहे. तब्बल १८०४ कोटींची जमीन केवळ ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे.महत्त्वाचे म्हणजे, या खरेदीनंतर केवळ दोन दिवसांतच स्टॅम्प ड्युटी माफ केल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे सरकारी नियमांना बगल देऊन जमीन व्यवहार झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

 अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी पार्थ पवार यांच्यावर हल्लाबोल करताना म्हटलं “१८०० कोटींची जमीन ३०० कोटींना विकत घेतली, आणि स्टॅम्प ड्युटी म्हणून अवघे ५०० रुपये भरले.हीच का पारदर्शकता? लोकांची फाईल दहा-दहा महिने पुढे जात नाही, पण पार्थ पवारांच्या फाईलला दोन दिवसांत मंजुरी मिळते?”दानवे यांनी पुढे सांगितले की, पार्थ पवार यांच्या कंपनीचं भांडवल केवळ १ लाख रुपये असून, अशा कंपनीला कोरेगाव पार्कसारख्या प्रीमियम भागात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची परवानगी कशी मिळाली, हा मोठा प्रश्न आहे.

 पार्थ पवारांची प्रतिक्रिया

या सर्व आरोपांवर पार्थ पवार यांनी माध्यमांना दिलेल्या छोट्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.पार्थ पवार यांच्याकडून माध्यमांना ‘आपण कोणतही चुकीचं काम अथवा घोटाळा केला नसल्याची’ फोनवरून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. अधिकची माहिती देण्यास मात्र पार्थ पवार यांच्याकडून नकार देण्यात आला आहे.

पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली, एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने 48 तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केली, तर केवळ 27 दिवसांत हा व्यवहार झाला असे अंबादास दानवे म्हटले आहे.

 विरोधकांचा सवाल

दानवे यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला “२२ एप्रिल २०२५ रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला आणि केवळ ४८ तासांत उद्योग संचालनालयाने स्टॅम्प ड्युटी माफ केली.अनुभव नसलेल्या कंपनीला अशी सवलत कोणत्या नियमात मिळाली?”त्यांनी सरकारवर थेट हल्ला चढवत म्हटलं  “फुले, शाहू, आंबेडकर यांची नावं घ्यायची आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या – हा अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे का?”

 राजकीय वातावरण तापले

या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनी पार्थ पवार आणि अजित पवार यांच्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. महसूल व उद्योग विभागाने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही विरोधकांकडून होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती