पुणे : पार्थ पवार यांच्या कंपनीवर होत असलेल्या जमीन घोटाळ्याच्या आरोपांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. त्यांनी चौकशीचे आदेश दिले असून पुणे शहरचे तहसीलदार सुर्यकांत येवले यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
पार्थ पवार यांच्यावर होणाऱ्या आरोपांनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचवेळी पार्थ पवार यांनी मात्र आपण कोणतेही चुकीचे काम अथवा घोटाळा केला नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
कथित जमीन घोटाळ्याच्या आरोपांमध्ये महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 मधील नियम 3 चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून पुणे शहरचे तहसीलदार सुर्यकांत येवले यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जमिनीची नोंदणीच बेकायदेशीर असल्याचा दावा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुद्रांक शुल्क विभागाने स्वतंत्र चौकशी सुरू केली असून 5 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. यात हवेली क्रमांक 3 चे दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांनाही तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
पार्थ पवारांवर काय आहेत आरोप?
पार्थ पवार संचालक असलेल्या अमीडिया कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील तब्बल 1800 कोटी मूल्य असलेली 43 एकर जमीन केवळ 300 कोटी रुपयांना विकत घेतल्याचा गंभीर आरोप होत आहे. शिवाय या संपूर्ण व्यवहारासाठी केवळ 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली, असाही दावा केला जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या कथित जमीन घोटाळ्याचे आरोप केले आहेत.