पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित, ‘अर्चना अनुराधा’ प्रस्तुत ‘मुक्ता’ हा कलात्मक प्रयोग शनिवार,दि.१५ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता, सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, भारतीय विद्या भवन,सेनापती बापट रस्ता,पुणे येथे होणार आहे.हा कार्यक्रम सुप्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका अरुणा ढेरे यांच्या ‘कृष्ण किनारा’ या पुस्तकावर आधारित आहे. या कार्यक्रमाची निर्मिती, संकल्पना, अभिवाचन, नृत्यदिग्दर्शन आणि प्रस्तुती अर्चना अनुराधा यांनी केली आहे.संहिता लेखन आणि अभिवाचन स्नेहल दामले यांनी केले असून, हिंदी गीतांची रचना प्रणव पटवारी यांनी केली आहे. संगीत दिग्दर्शन कौशल इनामदार यांचे असून, गायन रश्मी मोघे आणि मनोज देसाई यांचे आहे.नृत्य प्रस्तुती सानिका आपटे,मधुरा देशपांडे,इरा कुवळेकर,अनुष्का कुलकर्णी आणि निवेदिता निकम यांच्या आहेत.प्रकाश योजना ओंकार हजारे यांनी केली आहे.हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी केले आहे. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा २६३ वा कार्यक्रम असणार आहे.
कृष्ण किनारा हे पुस्तक म्हणजे सुप्रसिद्ध कवयत्री आणि लेखिका अरुणा ढेरे यांचे गद्य काव्यच म्हणता येईल.महाभारतातील राधा,द्रौपदी आणि कुंती या तीन स्त्रियांचं आणि कृष्णाचं एक विलक्षण नातं होतं.अतिशय तरल आणि हळूवार अशा या नात्याचे पदर उलगडताना या तिघीही आपल्याला नव्याने उमगत जातात.त्यांच्या देवत्वाच्या आत असलेलं सक्षम बाईपण लख्ख समोर येतं.आज हजारो वर्षानंतरही त्यांच्या जगण्याचे असंख्य तुकडे आसपासच्या बायकांच्या जगण्यात सतत दिसत राहतात.त्यांचं बाईपण आजही भिडत राहतं ! या साऱ्याचा मागोवा घेणारा हा कार्यक्रम आहे.