मुंबई : पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांचा योग्य वापर केल्यास बातमी लेखन, संशोधन आणि विश्लेषण अधिक प्रभावी करता येते, असे मत ‘एआय’ तज्ज्ञ किशोर जस्मानी यांनी केले.रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालय येथे प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासंदर्भात प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले, त्यावेळी जस्मानी यांनी मत व्यक्त केले.
‘एआय’ तज्ज्ञ किशोर जस्मानी म्हणाले की, ओपन एआय, जेमिनी आणि को-पायलट ही तीन प्रमुख एआय टूल्स पत्रकारांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तसेच क्लॉड, डीपसिक आणि परप्लेक्सिटी ही आणखी तीन प्रभावी टूल्स आहेत. प्रत्येक टूल्सचा वापर आवश्यकतेनुसार आणि उद्दिष्टानुसार करावा. जेमिनी संशोधनासाठी विशेषतः उपयुक्त आहे, तर डीपसिक उत्तरे देण्यात अधिक प्रभावी ठरते. मात्र, मेटा एआय हे पत्रकारितेसाठी तेवढे परिणामकारक नाही, असे त्यांनी नमूद केले.
किशोर जस्मानी यांनी स्पष्ट केले की, बिंग, को-पायलट, गूगल बार्ड, जेमिनी आणि परप्लेक्सिटी ही साधने संशोधनासाठी, तर चॅटजीपीटी, गूगल बार्ड आणि जेमिनी ही प्रभावी लिखाणासाठी उपयुक्त आहेत. ही टूल्स समस्या सोडविणे आणि सल्ला देणे यासाठीही पत्रकारांना मदत करू शकतात.प्रत्येक ‘एआय’ टूल्सचा परिणाम ज्ञान, प्रॉम्प्टिंग कौशल्य आणि तर्कशक्ती या तीन घटकांवर अवलंबून असतो. प्रॉम्प्टिंगचे तीन प्रकार, शून्य शॉट, संदर्भाधारित आणि भूमिकाधारित यांचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले. तसेच पत्रकारितेतील लेखन अधिक परिणामकारक करण्यासाठी ग्रामर्ली हे अॅपही उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
किशोर जस्मानी यांनी चॅटजीपीटी या साधनाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दाखविले. त्यांनी सांगितले की, फोटो आणि योग्य प्रॉम्प्ट दिल्यानंतर चॅटजीपीटी त्या आधारे वृत्तपत्रीय बातमी तयार करून देते. मात्र यासाठी योग्य प्रॉम्प्ट देणे अत्यावश्यक आहे.त्याचप्रमाणे चॅटजीपीटीवर आवाज रेकॉर्ड करून हवे त्या भाषेत लेखन करून घेता येते, तसेच व्हॉईस डिक्टेटद्वारेही हे टूल्स पत्रकारांना सहाय्य करते. या प्रक्रियेतून त्यांनी प्रॉम्प्ट, डिक्टेट आणि डिस्कशन अशा तीन प्रकारची प्रात्यक्षिके करून दाखविली.
‘एआय’ टूल्स हस्तलिखित प्रतीवरून स्वयंचलितपणे टंकलेखन करू शकतात. पीडीएफ स्वरूपातील मजकूर चॅटजीपीटीच्या मदतीने कसा उपयोगात आणता येऊ शकतो, याचे सविस्तर मार्गदर्शनही त्यांनी केले.या प्रशिक्षण सत्रात उपस्थित पत्रकारांनी ‘एआय’ साधनांचा वापर करून प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे सराव केला आणि संवादात्मक पद्धतीने मार्गदर्शन घेतले.