अकोला : अकोल्यातील एका तरुणाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून लग्नासाठी नवरी मिळवून देण्याची विनंती केली आहे. ग्रामीण भागातील मुलांची लग्नाची वये उलटून जात असूनही त्यांना मुलगी मिळत नसल्याची गंभीर समस्या या पत्रातून समोर आली आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितले की, शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत हे पत्र जयंत पाटील यांना वाचायला सांगितले होते. अनिल देशमुख यांनी या तरुणाच्या लग्नासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.
ग्रामीण भागातील तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. याचाच प्रत्यय अकोल्यातील एका तरुणाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रातून आला आहे. या तरुणाने थेट पवार यांना साकडं घालत म्हटलं आहे. “माझं लग्न होत नाहीये, मला पत्नी मिळवून द्या; तुमचे उपकार मी विसरणार नाही.”
शरद पवार अलीकडेच अकोल्यात झालेल्या शेतकरी संवाद कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान काही नागरिकांनी त्यांना निवेदनं दिली. त्यापैकीच एक निवेदन या अविवाहित तरुणाचं होतं. त्याच्या पत्रात स्वतःचा पत्ता आणि मोबाईल नंबरसह अत्यंत भावनिक विनंती करण्यात आली होती. हे पत्र पवार यांनी पक्षाच्या बैठकीत वाचण्यासाठी जयंत पाटील यांना दिलं, अशी माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.देशमुख यांनी सांगितले की, “या तरुणाच्या लग्नासाठी आम्ही प्रयत्न करू,” अशी खात्री त्यांनी दिली.
पत्रातील भावनिक मजकूर
या तरुणाने आपल्या पत्रात लिहिलं आहे “माझं वय वाढत चाललंय. भविष्यात माझं लग्न होणार नाही अशी भीती वाटते. मी एकटाच राहीन. माझ्या आयुष्याचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरीही राहायला मी तयार आहे. तिथे काम करीन, संसार नीट चालवीन — ही हमी देतो. मला जीवनदान द्या; तुमचे उपकार मी विसरणार नाही.”
ग्रामीण भागातील वास्तव
गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातील सुशिक्षित मुलींचं प्रमाण वाढलं आहे. अनेक मुली उच्च शिक्षण घेत नोकरीकडे वळत आहेत. परिणामी त्यांची जीवनमानाबाबतची आणि जोडीदाराबद्दलची अपेक्षा वाढली आहे.दुसरीकडे शेती करणारे किंवा ग्रामीण पार्श्वभूमीतील तरुण लग्नासाठी मागे पडत आहेत. या सामाजिक वास्तवामुळे अशा भावनिक घटनांचा उदय होत असल्याचं समाजशास्त्रज्ञांचे मत आहे.
सोशल मीडियावर चर्चेचा विषय
या पत्राची प्रत सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्या तरुणाच्या धैर्याचं कौतुक केलं आहे. काहींनी मात्र ग्रामीण भागातील वाढत्या अविवाहित तरुणांच्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं नमूद केलं आहे.
शेवटी प्रश्न उरतो आहे की, ग्रामीण भागातील तरुणांना किंवा शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे अनेक प्रकार सातत्याने कानावर पडत आहेत. मात्र, ही समस्या खरोखरच किती विदारक असू शकते, याचे प्रत्यंतर या तरुणाच्या पत्रातून येते. अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील सुशिक्षित मुलींची संख्या वाढली आहे. शिक्षण घेऊन नोकरी करणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे साहजिकच या मुलींच्या होणाऱ्या नवऱ्याविषयीच्या आणि एकूण जीवनमानाविषयीच्या आकांक्षा वाढल्या आहेत. ग्रामीण भागातील मुलापेक्षा शहरा भागातील नोकरदार तरुणांना मुलींची जास्त पसंती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना लग्नासाठी मुली मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आता शरद पवार या तरुणाची इच्छा पूर्ण करण्यात यशस्वी ठरणार का, हे आता बघावे लागेल.शरद पवार या तरुणाचं ‘लग्नाचं स्वप्न’ पूर्ण करण्यात यशस्वी ठरतील का? हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरतंय.