मुंबई : ‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा २०२५’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच भारतीय संविधानाविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी हा उपक्रम अधिक व्यापक स्वरुपात राबवावा, अशा सूचना महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिल्या.‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा उपक्रम २०२५’ ची आढावा बैठक महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या कार्यालयात झाली. बैठकीस शिक्षण, सामाजिक न्याय, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, आदिवासी, अल्पसंख्यांक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले की, या स्पर्धेचे प्रारूप लवकरच तयार केले जाणार आहे. संबंधित विभागांनी या स्पर्धेची संपूर्ण पूर्वतयारी करावी. प्रत्येक शाळेतून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी जनजागृती करावी. या स्पर्धेसाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद शाळांना उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून करण्यात यावी.शालेय शिक्षण विभागाने हा उपक्रम अधिक व्यापक प्रमाणात राबवण्यासाठी आवश्यक परवानगी त्यांच्या स्तरावर घ्यावी. याबाबत तातडीने कार्यवाही करून अहवाल कार्यालयास सादर करावा, असेही धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले.
आदिवासी विकास विभागाने त्यांच्या अखत्यारित असलेल्या वसतिगृहात हा उपक्रम राबवण्याची संपूर्ण तयारी केली असल्याचे सांगितले. सामाजिक न्याय विभागानेही शासकीय निवासी शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यासाठी खर्चाची तरतूद केली जात असल्याचे सांगितले. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे सांगितले.अल्पसंख्यांक विभागामार्फत अल्पसंख्यांक विभाग योजनेचे लाभार्थी मुलांची वसतिगृह, शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी यांनाही उपक्रमात सहभागी करून घेतले जाईल असे सांगितले. प्रश्नमंजुषा उपक्रम www.yuvacareer.com या संकेतस्थळाद्वारे राबविण्यात येणार आहे.