सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • धक्कादायक! काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी अंत,मुंबईहून चिखलीकडे परतताना काळाचा घाला;राजकीय क्षेत्रात शोककळा
  • तुमच्या मुलाच्या बाबतीत कट रचला असता तर..; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवरुन अजित पवारांना सवाल
 जिल्हा

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने ११ भाषांमध्ये थेट भाषांतराचा अभिनव प्रयोग

डिजिटल पुणे    13-11-2025 17:42:12

मुंबई  : अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त अमरावती येथे झालेल्या भारतीय अभिजात भाषा परिषदेत तंत्रज्ञान आणि परंपरेचा सुंदर संगम पहायला मिळाला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ६ ते ८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित या परिषदेत देशातील अकरा अभिजात भाषांचे तज्‍ज्ञ, संशोधक आणि विद्वान सहभागी झाले होते. या परिषदेत डिजिटल इंडिया भाषिनी विभागाने विकसित केलेल्या “श्रुतलेख” या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित स्पीच-टू-टेक्स्ट उपयोजकाद्वारे प्रथमच थेट बहुभाषिक भाषांतराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

या अभिनव प्रयोगामुळे परिषदेत झालेले भाषण आणि विचार विविध भाषांतील प्रेक्षकांना एकाच वेळी त्यांच्या भाषेत स्क्रीनवर दिसत होते. अशा प्रकारचा हा देशातील पहिला प्रयोग ठरला असून, भाषा क्षेत्रातील डिजिटल नवकल्पनेच्या दिशेने भारताने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.मराठी भाषा विभाग आणि रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी परिषदेला संबोधित करताना सांगितले की, “पहिल्यांदाच देशातील सर्व अभिजात भाषांचे स्वर एकाच मंचावर आणि डिजिटल माध्यमातून ऐकू आले. ‘श्रुतलेख’ या अ‍ॅपच्या माध्यमातून भाषेतील अडथळे दूर होत आहेत. ही केवळ तांत्रिक नव्हे, तर सांस्कृतिक एकतेची नवी दिशा आहे.”

परिषदेला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगांवकर, तसेच संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाटे उपस्थित होते.परिषदेची सुरुवात पारंपरिक ‘दिंडी’ मिरवणुकीने झाली. मेळघाट आदिवासी समुदायाच्या पारंपरिक नृत्य, गीत व लेझीम सादरीकरणाने कार्यक्रमाचे वातावरण भारावून गेले. या परिषदेत तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम, ओडिया, मराठी, प्राकृत, पाली आणि आसामी या भाषांतील तज्‍ज्ञांनी अभिजात भाषांच्या जतन, संवर्धन आणि भविष्याविषयी विचारमंथन केले.

मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी सांगितले की, भारतीय अभिजात भाषा परस्पर संवाद आणि सहकार्याच्या माध्यमातून फुलल्या आहेत. त्यांचे भविष्यही या सहकार्यावरच अवलंबून आहे. मराठी भाषेचा विकास फक्त साहित्यापुरता मर्यादित न राहता तो रोजगार आणि उद्योगाच्या भाषेत व्हावा, ही वेळेची गरज आहे.भाषिनी विभागाचे व्यवस्थापक समीर पाटील यांनी सांगितले की, या परिषदेदरम्यान ११ स्वतंत्र स्क्रीनवर थेट बहुभाषिक भाषांतर (Real-time Transcription) दाखविण्यात आले. हा देशातील पहिला असा प्रयोग असून भारताच्या स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा तो उत्कृष्ट दाखला आहे.


 Give Feedback



 जाहिराती