चंद्रपूर : अपर मुख्य सचिव तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकसचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी गुरुवारी विसापूर (ता. बल्लारपूर) येथे निर्माणाधीन असलेल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) बांधकामाची प्रगती तसेच बॉटनिकल गार्डन येथे नव्याने तयार झालेल्या प्लॅनेटोरीयमला भेट देऊन पाहणी केली.यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक रामानुजम, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, बल्लारपूरच्या तहसीलदार रेणुका कोकाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर क्षेत्राचे संचालक डॉ. राजेश इंगोले, सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड उपस्थित होते.
विद्यापीठाचे बांधकाम दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना पालकसचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी दिल्या. यावेळी त्यांनी वाचनालय आणि इंडोर स्टेडियमची पाहणी करून विद्यापीठाबाबत माहिती जाणून घेतली. यात विद्यार्थी संख्या, सुरू असलेले अभ्यासक्रम आदी बाबींचा समावेश होता. डॉ. राजेश इंगोले आणि डॉ. बाळू राठोड यांनी उपस्थितांना विद्यापीठाची प्रगती आणि सद्यस्थितीची माहिती दिली.
एसएनडीटी विद्यापीठाच्या ठळक बाबी : शैक्षणिक व प्रशासकीय इमारत, वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, सेमिनार हॉल, स्टुडियो, वसतीगृह इमारत, ग्रंथालय इमारत, सभागृह, कॅफेटेरिया, भोजनगृह, क्रीडा सुविधा, अतिथीगृह, सेंट्रल एक्झिबिशन हॉल, कर्मचारी निवासस्थान, संरक्षण भिंत आदींचा समावेश आहे.बॉटनिकल गार्डन येथे भेट : पालकसचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी विसापूर येथील श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डनला भेट देऊन तसेच नवनिर्माणाधीन असलेल्या प्लॅनेटोरीयमच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य वनसंरक्षक रामानुजम, उपवनसंरक्षक योगेश वाघाये आदी उपस्थित होते.