उरण : भावनाताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, महाविकास आघाडीचा विजय असो असे जोरदार घोषणाबाजी करत श्री राघोबा मंदिर कोटनाका ते उरण नगर परिषद रॅली काढून महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत नगराध्यक्ष पदाचे महा विकास आघाडीचे उमेदवार भावनाताई घाणेकर व इतर नगरसेवक पदाचे उमेदवारांनी आपला अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी उद्धव कदम यांच्याकडे सुपूर्द केला.
उरण नगर परिषदेची २ डिसेंबर २०२५ रोजी निवडणूक व ३ डिसेंबर २०२५ रोजी निकाल आहे.एकूण १० प्रभाग मधून २१ नगरसेवक व १ नगराध्यक्ष अशा एकूण २२ पदासाठी निवडणूक होत आहे.नगराध्यक्ष व नगरसेवक पदाची उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर २०२५ असून ही तारीख जवळ आल्याने सर्वच पक्षात लवकरात लवकर उमेदवारी अर्ज भरण्याकडे कल होता. अनेक पक्षानी आपले उमेदवारी अर्ज दाखल सुद्धा केले.शनिवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श्री.शरदचंद्र पवार गट ), शिवसेना (श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ), काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
श्री राघोबा मंदिर कोटनाका ते उरण नगर परिषद अशी रॅली यावेळी काढण्यात आली. या रॅलीला जनतेचा, पदाधिकारी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळाला. राष्ट्रवादीचे डॅशिंग नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत,शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्ह्याध्यक्ष संदेश ठाकूर,शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस रवी घरत, ज्येष्ठ नेते महादेव बंडा,माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र सचिव सूरदास गोवारी,महाराष्ट्र सचिव समाजभूषण उत्तमराव गायकवाड, शेकापचे रमाकांत पाटील, शिवसेनेचे महादेव घरत,शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे,काँग्रेस तालुका कमिटी अध्यक्ष विनोद म्हात्रे,काँग्रेसचे दीपक पाटील, अल्पसंख्यांक अध्यक्ष अखलाख शिलोत्री आदि प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भावनाताई घाणेकर व इतर नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर भावनाताई घाणेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला
यावेळी भावनाताई घाणेकर यांनी सांगितले की उरण शहरात अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. समस्या सोडविल्या जात नाहीत. नागरिक त्रस्त झाले आहेत.मात्र सत्ताधारी पक्षाचे याकडे नेहमी दुर्लक्ष झालेले आहे.आम्हाला जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत.जनतेचा, उरणचा सर्वांगीण विकास करायचा आहे म्हणून आम्ही महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र लढत आहोत आमचा विजय नक्कीच होणार आहे.जनतेने आम्हाला पाठिंबा द्यावा,साथ द्यावी असे मी आवाहन करते असे मत भावनाताई घाणेकर यांनी व्यक्त केले. तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उरणच्या जनतेला चांगले माहित आहे मतदान कोणाला करायचे ते उरणच्या विकासासाठी महा विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना जनतेने पाठिंबा द्या ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे .
निवडणुकीत स्थानिक भूमिपुत्र नक्कीच कोणाला मतदान करायचं ते ठरवतील असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनीही सर्वांनी एकत्रित काम करून आपले ताकद दाखवा एक जूटीने काम करा. भावनाताई घाणेकर या स्थानिक उमेदवार आहेत लढाऊ आहेत त्यांचे वडील येथील स्थानिक आहेत भावनाताई संपूर्ण महाराष्ट्रात फिरतात अन्याया विरोधात आवाज उठवतात अशा महिलेला निश्चितच संधी दिली पाहिजे असे मत महेंद्र घरत यांनी व्यक्त केले. शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस रवि घरत यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली.सर्वांनी एकत्र येऊन संपूर्ण ताकदीनिशी लढूया,महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच उमेदवार निवडून आले पाहिजे यासाठी प्रत्येकाने कामाला लागा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(श्री शरचंद्र पवार गट) शिवसेना (श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ),काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज भरलेले नगराध्यक्ष व नगरसेवक यांची नावे :- नगराध्यक्ष - भावना घाणेकर,प्रभाग क्र १ मधून प्रीती कोळी (अ ), राकेश कोळी( ब ), प्रभाग क्र.२ मधून रसिका मेश्राम (अ ), विक्रांत म्हात्रे (ब ), प्रभाग क्र. ३ मधून वंदना पवार (अ ), अमित म्हात्रे (ब ), प्रभाग क्र ४ मधून अतुल ठाकूर (अ ), प्रमिला पवार (ब ), प्रभाग क्र. ५ मधून नाहिदा ठाकूर (अ ), अफशा मुकरी (ब ), प्रभाग क्र. ६ मधून मंगेश कासारे (अ ), तनिषा पाटिल (ब ), प्रभाग क्र. ७ मधून प्रार्थना म्हात्रे (अ ), शादाब शेख (ब ), प्रभाग क्र. ८ मधून विना तलरेजा (अ ), विजय जाधव (ब ), प्रभाग क्र. ९ मधून हेमंत पाटिल(अ ), यशस्वी म्हात्रे (ब ), प्रभाग क्र. १० मधून ओमकार घरत (अ ), कमल पाटिल (ब ), लता पाटिल (क )