सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लिम नगरसेवक विजयी, नाशिक जिल्ह्यात खातं उघडलं
 जिल्हा

प्रत्येक आदिवासी पाड्याला विकासाचा प्रत्यय देवू – केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम

डिजिटल पुणे    18-11-2025 15:05:18

नागपूर :-  भारतातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकार एका कटिबध्दतेने काम करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 हजार 700 कोटी रुपयांपेक्षा अधिक विविध विकास योजना जाहीर केल्या. प्रधानमंत्री जनमन व इतर योजनांतर्गत आदिवासी जनजातीसाठी पक्के घर उपलब्ध करुन दिली जात आहेत. 26 राज्य व 4 केंद्रशासीत प्रदेशातील  सूमारे 549 जिल्हे, 2 हजार 911 तहसील क्षेत्रातील सूमारे 63 हजार 842 गावातील आदिवासींसाठी विशेष मोहीम असून  प्रत्येक आदिवासी पाड्याला आम्ही विकासाच्या प्रवाहात आणू असे प्रतिपादन केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम यांनी केले.

भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण व युवक युवती सम्मेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके, मध्य प्रदेश येथील जनजातीय कार्य मंत्री कुवर विजय शाह, खासदार फग्गनसिंह कुलस्ते, माजी महापौर मायाताई ईवनाते, माजी खासदार समीर उराव, रंजना कोडापे, आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, आदिवासी विकास आयुक्त लिना बनसोड, अपर आयुक्त आयुषी सिंह व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आदिवासी विकास विभागाद्वारे मोठ्या प्रमाणात नवीन एकलव्य स्कूल आम्ही सुरु करीत आहोत. भक्कम शैक्षणिक सुविधांच्या माध्यमातून आदिवासी समाजातूनही मोठ्या प्रमाणात डॉक्टर, अभियंते तयार होतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याला विशेष भर देऊन गत सहा वर्षांमध्ये एकलव्य शाळेसाठी 18 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी वितरीत केला. यात नवीन 50 एकलव्य शाळा आपण साकारत आहोत. एकलव्य शाळेतील विद्यार्थ्यांनीही आपली चुनूक दाखविल्याचे मंत्री जुएल ओराम यांनी  सांगितले.

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाच्या माध्यमातून आदिवासी गावात विकासाचा एक नवा अध्याय निर्माण केला जात आहे. सूमारे 60 हजार पेक्षा अधिक गावात हे अभियान सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. आदिवासी समाजाला दिशा मिळण्यासाठी नागपूर येथील आयोजित करण्यात आलेला हा भव्य समारंभ इतर राज्यांसाठी दिशादर्शक असल्याचे गौरोद्वगार त्यांनी काढले.

तीन दिवसीय महोत्सवातून आदिवासी समाजात नव आत्मविश्वास –  आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके

क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित या तीन दिवसीय भव्य महोत्सवातून संपूर्ण आदिवासी समाजात नवा आत्मविश्वास निर्माण करण्यात यश आले. तीन दिवस आदिवासी समाजातील शिकलेले अधिकारी, नवीन पिढी यांच्या विचाराला चालना देता आली. यात उत्तम संवाद घडून आला. याबरोबर आदिवासी संस्कृतीतील नृत्य प्रकाराला प्रवाहित करता आल्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले.

आदिवासी मुलींनी अधिक धाडसी बनावे-  अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ

रोजगार व स्वयंरोजगारातील नवीन संधी या शिक्षणातून निर्माण होणाऱ्या आहेत. याला धैर्य आणि कल्पकतेची, कौशल्याची जोड असणे आवश्यक आहे. या संधीला गवसणी घालण्यासाठी आदिवासी समाजातील मुलींनी आपल्यातील लाजाळूपणा बाजुला ठेऊन अधिक धाडसी व धैर्य घेऊन शिक्षणासाठी स्वत:ला सिध्द करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी केले. लोकसभा सदस्य फग्गनसिंह कुलस्ते, मध्यप्रदेशचे जनजातीय कार्य मंत्री कुवर विजय शाह, दीपमाला रावत, श्रीमती रंजना कोडापे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आदिवासी नृत्य स्पर्धेतील विविध विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रशस्तीपत्र व पुरस्काराचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.

पारंपारिक आदिवासी नृत्य स्पर्धेत विजेते

समूह गोंडी नृत्य प्रकारात प्रथम पारितोषिक (30,000/-रुपये) यवतमाळ जिल्ह्यातील झरी-जामनी येथील आदिवासी पारंपरिक ढोल नृत्याला देण्यात आले. व्दितीय पारितोषिक (20,000/-रुपये ) कळवण येथील डोंगरी देव आदिवासी कला नृत्य संघाला देण्यात आले. तृतीय पारितोषिक चिमूर येथील आदिवासी पारंपरिक परधान नृत्य 15,000/-रुपये व हिंगणघाट येथील जंगो लिंगो खापरी, संघास 15000/- प्रोत्साहनपर (5000/- रुपये) भिल्ल नाईकडा नृत्य, कोर्टा संघाला देण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अथक परिश्रम करणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा भेंडे यांनी केले तर आभार अपर आयुक्त आयुषी सिंह यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आदिवासी विकास विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गाने अहोरात्र परिश्रम घेतले.


 Give Feedback



 जाहिराती