मुंबई : सरपंच संवाद हा ‘क्यूसीआय’ने तयार केलेला प्लॅटफॉर्म, देशभरातील सरपंचांचा हक्काचा प्लॅटफॉर्म आहे. आज त्याच्यावर पंचवीस हजार सरपंचांसोबत एकावेळी आपण संवाद साधत आहोत ही अभिनंदनीय बाब आहे. या संवादातून ग्रामविकासात आलेली प्रगल्भता लक्षात येते. अशा सशक्त संवादातून निश्चितपणे आपण समृद्ध राज्य आणि समृद्ध देश तयार करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.मुख्यमंत्री यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी आयोजित क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाद्वारा तयार केलेल्या ‘सरपंच संवाद’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर राज्यातील तब्बल २५ हजार सरपंचांनी ऑनलाईन सहभाग नोंदवत मुख्यमंत्र्यांसोबत थेट संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, भारतीय गुणवत्ता परिषदेच्या नियामक मंडळ सदस्य हिमांशु पटे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, यांच्या सह अन्य संबंधित उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ग्राम विकासाशिवाय राज्याचा व देशाचा विकास होऊ शकत नाही. केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत ग्रामविकासाला प्राधान्य देत मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या ग्रामसमृद्धीच्या संकल्पनेतील समृद्ध आदर्श गाव निर्माण करण्यासाठी गावाच्या विकासकामांमध्ये लोकसहभाग आणि नेतृत्व या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरणाऱ्या आहेत.
गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच हे परिवर्तनकर्ते आहेत. गावाचे नेतृत्व सरपंच करतात. त्यामुळे सरपंचांची थेट निवडणूक ही परिवर्तनाची मोठी पायरी ठरल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासनाच्या योजना गावात पोहचवून गावांचा विकास करण्याचे काम सरपंच करतात. सरंपचांनी शेतकरी, महिला, बालक, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि महिला बचत गटांसाठी केंद्र-राज्य सरकारने दिलेल्या निधीचा सर्वोत्तम उपयोग करावा. कारण विविध योजना, अभियानातून गावांमध्ये मूलभूत काम उभे करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जलयुक्त शिवार अभियानात राज्यात झालेले उल्लेखनीय काम ज्यामध्ये या योजनेने केवळ पाणी साठवणूक करत जलसंधारणाचेच काम केले नाही तर जलयुक्त शिवार अभियानातून गावात नेतृत्व, सामूहिक शक्ती यातून किती मोठ्या प्रमाणात परिवर्तन करता येते याची प्रचिती लोकांना आली. या अभियानाने शेतीतील प्रगतीची नवी दिशा दिली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सगळ्या गावांनी अतिशय उत्तम काम केलं आहे. राज्यातील प्रत्येक गाव स्मार्ट ग्राम बनवण्याचा संकल्प व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, फायबर नेटवर्कनंतर आता स्टारलिंकच्या सहकार्याने सर्वोत्कृष्ट इंटरनेट कनेक्टिव्हिटी गावापर्यंत दिली जाईल. स्मार्ट उपकरणांमुळे उत्पादकता वाढून शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल, असे त्यांनी सांगितले.
सौर पंप योजनेत महाराष्ट्राचा लवकरच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
सौर पंप योजना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर यशस्वी होत असून, जागतिक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड महाराष्ट्राच्या नावावर होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. “दिवसा पंप आणि रात्री घराला मोफत वीज – अशा खर्च बचतीच्या संकल्पना आता वास्तवात येत आहेत.
शासन नैसर्गिक शेतीची संकल्पना मिशन म्हणून राबवणार असून उत्पादन खर्च कमी करत शेतीला शाश्वत करण्यावर भर देत आहे.राज्य सरकार दरवर्षी ₹५,००० कोटी कृषी क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे कारण शेतीत गुंतवणूक केल्यावरच शेतीची उत्पादकता, आर्थिक लाभ वाढवता येणार असून महिला बचत गट, फूड प्रोसेसिंग, ठिबक सिंचन, यांत्रिकीकरण, शेतरस्ते, सौरग्राम, मूल्यशिक्षण अशा विविध योजनांच्या यशस्वी व्यापक अंमलबजावणीमुळेच खरा विकास शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
क्यूसीआय, व्हीएसकेसी आणि अनुलोम यांच्या माध्यमातून गावांना प्रशिक्षण, तांत्रिक मदत आणि उत्कृष्टतेची संधी मिळत असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की, गुणवत्ता हीच खरी विकासाची गुरुकिल्ली आहे. विविध अभियान,स्पर्धा यांच्या माध्यमातून सरपंचांना नेहमी स्पर्धात्मक मोडमध्ये ठेवून प्रत्येक गावाला समृद्ध बनवण्याचा संकल्प सर्वांच्या सहभागाने यशस्वी करत समृद्ध महाराष्ट्र घडवू, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
उल्लेखनीय काम करणाऱ्या सरपंचांसोबत संवाद साधून मुख्यमंत्री यांनी यावेळी सर्व सरंपचांचे अभिनंदन केले. यावेळी ग्रामविकास, शेती, जलसंधारण, महिला सबलीकरण आणि स्मार्ट गाव या विषयांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.