मुंबई : वित्तीय सेवा विभाग, अर्थ मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या सल्ल्यानुसार राज्यस्तरीय बँकर्स समिती (एसएलबीसी) महाराष्ट्र व जिल्हा अग्रणी बँकेतर्फे राज्यात “हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा” या उपक्रमांतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश विविध बँका व वित्तीय संस्थांमधील दीर्घकाळापासून निष्क्रिय ठेवी, शेअर्स, लाभांश, विमा पॉलिसी, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) यांसारख्या मालमत्तेबाबत जनजागृती करणे आणि योग्य हक्कदारांना माहिती उपलब्ध करून देणे हा आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील शिबिराचे आयोजन 21 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात येणार असून, हा मेळावा उत्तर भारतीय संघ, टीचर्स कॉलनीच्या मागे, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या वेळेत होणार आहे.
शिबिरादरम्यान नागरिकांना निष्क्रिय खात्यांची माहिती, दाव्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन, तसेच संबंधित बँक अधिकाऱ्यांशी थेट संवादाची सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय ऑनलाइन पोर्टलद्वारे मालमत्तेची तपासणी करण्यास मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
राज्यस्तरीय बँकर्स समितीने नागरिकांना आवाहन केले आहे की, या शिबिरात सहभाग घेऊन स्वतःची किंवा कुटुंबीयांच्या निष्क्रिय ठेवी व वित्तीय मालमत्ता तपासून आवश्यक दावा सादर करावा. वरिष्ठ बँक अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी आणि संबंधित संस्थांचे अधिकारी या शिबिरात उपस्थित राहणार आहेत.