दिल्ली : दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेतील मानसिक छळाला कंटाळून दहावीमध्ये शिकणाऱ्या मराठी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून उडी मारत या विद्यार्थ्याने जीव गमावला. मृत विद्यार्थ्याचे नाव शौर्य प्रदीप पाटील (वय – 15) असून तो मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर गावचा रहिवासी आहे.
कुटुंब दिल्लीमध्ये स्थायिक
शौर्यचे वडील प्रदीप पाटील सोने–चांदी गाळाई व्यवसायानिमित्त दिल्लीत कुटुंबासह अनेक वर्षे वास्तव्यास आहेत. शौर्य सध्या कुटुंबासह राजीव नगर भागात राहत होता आणि सेंट कोलंबस विद्यालयात दहावीचा विद्यार्थी होता.
घटनेचा संपूर्ण क्रम
शिक्षिकांनी मानसिक छळ केल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, असे शौर्य याने दीड पानाच्या सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी प्रिन्सिपल अपराजिता पाल आणि मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस या शिक्षिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. जखमी अवस्थेतील शौर्य यास पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शौर्य याचे वडील कामानिमित्त गावी ढवळेश्वरला आले होते. याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर ते तातडीने दिल्ली येथे पोहोचले. आज त्याच्यावर गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.
सुसाईड नोटमध्ये काय लिहिले होते?
सुसाईड नोटमध्ये शौर्यने शाळेतील प्राचार्या आणि काही शिक्षिकांवर मानसिक छळ केल्याचा स्पष्ट आरोप केला आहे. दिल्ली पोलिसांना शौर्य पाटील याच्या स्कूल बॅगमध्ये सुसाइड नोट सापडली. त्यात 'मेरा नाम शौर्य पाटील हैं... इस मोबाइल... नंबर पर कॉल कर देना प्लीज... आय अॅम व्हेरी सॉरी... आय डीड धीस...पर स्कूलवालोंने इतना बोला की, मुझे यह करना पडा. यदी किसी को जरूरत हो तो मेरे अंग दान कर देना. मेरे पॅरेंटसने बहुत कुछ किया, आय अॅम सॉरी, मैं उनको कुछ नहीं दे पाया... सॉरी भैय्या... सॉरी मम्मी, आपका आखरी बार दिल तोड रहा हूं... स्कूल की टीचर है ही ऐसी क्या बोलू....असा स्कूल बॅगमध्ये सापडली सुसाईड नोटमध्ये उल्लेख होता.
शिक्षकांवर गुन्हा दाखल
शौर्यच्या सुसाईड नोटच्या आधारे राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी प्राचार्या अपराजिता पाल, तसेच मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस या शिक्षिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वडिलांचा आरोप : “सात–आठ महिन्यांपासून मुलावर मानसिक छळ”
शौर्यचे वडील प्रदीप पाटील म्हणाले की, ही घटना मंगळवारी घडली. माझ्या आईचं ऑपरेशन झालं होतं. आई आयसीयूमध्ये असल्याने मी कोल्हापूरला आलो होतो. सकाळी सात वाजता माझ्या मुलाला ड्रायव्हर शाळेत सोडून आला. ड्रायव्हर मुलाची पावणे दोन वाजता वाट बघत होता. मात्र, तो आला नसल्याने ड्रायव्हरने घरी फोन केला की शौर्य अजून आलेला नाही. त्याच्या एका मित्राने त्याला गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो मेट्रोकडे गेला. त्याच्या मित्राने माझ्या बायकोला फोन करून सांगितले की, आज शौर्य आलेला नाही. तो मेट्रोकडे गेलेला आहे. मला पावणे तीन वाजता फोन आला. तुम्ही शौर्य पाटीलचे नातेवाईक बोलत आहात का? तो पुलावरून पडलेला आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहोत. सुरुवातीला आम्हाला वाटले की काहीतरी अपघात झालेला आहे. पण जेव्हा पोलिसांशी बोलणे झाले तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की, त्याच्याजवळ सुसाईड नोट सापडली आहे. तेव्हा मला समजले की, त्याने आत्महत्या केलेली आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रदीप पाटील पुढे म्हणाले की, गेल्या सात-आठ महिन्यापासून तो सांगत होता की, तिथले टीचर्स मला त्रास देत आहेत. मी तिथे पॅरेंट्स टीचर मिटिंगला देखील गेलो होतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांना शिक्षक सांगतात की, तुमचा विद्यार्थी खोडकर आहे. पण त्या नॉर्मल गोष्टी असतात. पण, त्यानंतर देखील काही विद्यार्थ्यांना शिक्षकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. चार दिवसांपूर्वी एका शिक्षकाने त्याला सांगितले की, तुला आम्ही टीसी देऊ. तेव्हापासून तो निराश असावा. यानंतर आत्महत्येच्या दिवशी एका कार्यक्रमात तो पाय घसरून पडला. त्यावेळी शिक्षकांनी आरोप लावला की, तू पाय घसरून पडला नाही तर मुद्दाम पडलेला आहेस. तेव्हा तो खूप रडत होता. पण शिक्षकांनी त्याला म्हटले की, तुझा ड्रामा बंद कर. यावेळी मुख्याध्यापिका देखील तिथेच होत्या. पण त्यांनी देखील काही केले नाही, असा आरोप त्यांनी केलाय.दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी प्रदीप पाटील यांनी केली आहे.
कुटुंबाची मागणी – दोषींवर कठोर कारवाई हवी
शौर्यचे चुलते म्हणाले की, आम्ही आज आमच्या घरातील चांगला मुलगा गमावला आहे.त्याने सुसाईड नोट लिहिलेली आहे. त्यात म्हटले आहे की, मला न्याय हा आहे की बाकीच्या मुलांसोबत शिक्षकांनी असा अत्याचार करू नये आणि हीच माझी शेवटची मागणी आहे. आमची देखील इच्छा आहे की, त्याला समाजाने न्याय द्यावा. ही घटना सर्व शाळेतल्या मुलांसमोर घडली होती. त्याला तो अपमान वाटला. सगळ्यांसमोर जो अपमान झाला तो खूप मोठा झाला. आमच्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे. इथून पुढे कुठल्याही कुटुंबावर असा प्रसंग येऊ नये, अशी विनंती करत आहोत. या प्रकरणात ठोस कारवाई करावी जेणेकरून इथून पुढे तिथे असे प्रकार घडणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.