पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'प्रगल्भ' हा नृत्याविष्कार २० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात उत्साहात पार पडला. नृत्ययात्री आणि कलासक्त या संस्थांनी प्रस्तुत केलेल्या या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.वेदांती भागवत -महाडिक यांनी केलेल्या एकल कथक सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नृत्याची लयकारी, भावाभिनय आणि नृत्य रचनांतील परिपक्वता यामुळे उपस्थितांची दाद मिळाली. त्यानंतर केतकी शेणोलीकर यांनी भरतनाट्यमचे एकल सादरीकरण केले. पारंपरिक शैलीचा नितांत सुंदर आविष्कार आणि नृत्याभिनयातील सूक्ष्मता यामुळे त्यांनी रसिकांचे मन वेधून घेतले.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण 'महाश्वेता ' ही भरतनाट्यम नृत्यनाटिका ठरली. डॉ. सुधा मूर्ती यांच्या कादंबरीवर आधारित या सादरीकरणात अनेक नृत्यांगनांनी सहभाग घेतला. कथानकाची मांडणी, संगीत, नृत्यरचना आणि प्रस्तुतीतील नाट्यमयता यामुळे कार्यक्रमाला विशेष उठाव मिळाला. नृत्यकलेतील परंपरा, सौंदर्य आणि विविध अंगांचा संगम अनुभवण्याची संधी प्रगल्भमुळे रसिकांना मिळाली.
मेघना साबडे यांनी प्रास्ताविक केले.रसिका गुमास्ते,स्मिता सोमण, गौरी दैठणकर आदी सहभागी झाले.कार्यक्रम विनामूल्य होता. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत हा २६५ वा कार्यक्रम ठरला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानत भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी रसिकांच्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले आणी कलाकारांचा सत्कार केला.