उरण : "धुतूम गावची जिल्हा परिषद शाळा सुसज्ज आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने हाती घेतलेले काम अभिमानास्पद आहे. राजकीय इच्छाशक्ती असेल तर सर्व काही शक्य आहे. हे धुतूम ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सुचिता ठाकूर, उपसरपंच आणि सदस्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळेच उरण तालुक्यातील धुतूम ग्रामपंचायत सध्या रायगड जिल्ह्यात विकास कामांत अग्रेसर आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी एकदिलाने काम करत आहेत. विकास कामांत राजकीय चपला बाहेर ठेवून काम करण्याची ग्रामपंचायतीची भूमिका कौतुकास्पद आहे. उद्योजक पी. जी. शेठ ठाकूर, माजी आमदार मनोहर भोईर यांची सहकार्य करण्याची वृत्ती महत्त्वाची आहे. त्यामुळे धुतूम ग्रामपंचायतींचा विकास कामांचा धडाका आणि नावलौकिक कायम राहील," असा विश्वास आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी धुतूम येथे व्यक्त केला.ते म्हणाले, "मी माणुसकी भावनेने 'सुखकर्ता' वरून मदतीचा अखंड प्रवाह सुरूच ठेवला आहे.
दिनदुबळ्यांची सेवा, मदत ही खरी ईश्वर सेवा, हे मला माझ्या आई-वडिलांनी शिकविले आणि तोच धर्म मानून मी काम करतोय.""इंडियन ऑईल अदानी व्हेंचर, अल्ट्रा टेक सिमेंट कंपनी, सी-बर्ड यांसारख्या कंपन्या आणि त्याचा अधिकारी वर्ग गेली अनेक वर्षे सहकार्याची भूमिका घेऊन धुतूम ग्रामपंचायतीला मदत करीत आहेत. त्यामुळे विकासकामांना गती मिळाली आहे. त्याबद्दल अधिकारी वर्गाचे अभिनंदन," असेही यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले."उरण तालुक्यात काम करीत असताना महेंद्रशेठ घरत यांची उत्तम साथ आम्हाला मिळतेय. धुतूम ग्रामपंचायतीला जेएनपीटीचा सीआरएस फंड मिळालाच पाहिजे, यासाठी मी आणि महेंद्रशेठ प्रयत्न करू," असे माजी आमदार मनोहर भोईर यावेळी म्हणाले.
उरण तालुक्यातील धुतूमच्या जिल्हा परिषद शाळेत अत्याधुनिक संगणक कक्षाचे उद्घाटन, पिण्याच्या पाण्याची नवीन पाईप लाईन, अत्याधुनिक कापडी पिशव्या मशीनचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि उद्योजक पी. जी.शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी धार्मिक स्थळ सुशोभीकरण अंतर्गत साहित्य वाटप धुतूम ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवारी करण्यात आले.यावेळी धुतूमच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत आणि शिवरायांची महती सांगणारे गीत गायले.
यावेळी सर्व शिक्षकवृंद उपस्थित होता. यावेळी गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती उरण निर्मला घरत, रामकृष्ण घायल वरिष्ठ महाव्यवस्थापक अल्ट्राटेक, इंडियन ऑईल अदानी व्हेंचरच्या वरिष्ठ अधिकारी नाझनीन शेख, सतीश म्हात्रे, एचआर संदीप काळे, प्रफुल्ल म्हात्रे, सीबर्डचे वैभव कदम, सरपंच सुचिता ठाकूर, उपसरपंच सुचिता कडू, सदस्य स्मिता ठाकूर, कविता पाटील, करिष्मा ठाकूर,अनिता ठाकूर, रविनाथ ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर, चंद्रकांत ठाकूर, प्रकाश ठाकूर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी धुतुम ग्रामपंचायत तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधा, योजना बाबत नागरिकांनी, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.