उरण : मालेगाव येथील बालिकेवरील हत्तेचा अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने तीव्र निषेध केला आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे.आपल्या भावना व्यक्त करताना महिला पदाधिकारी म्हणाल्या कि महाराष्ट्रात महिला आणि लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या वाढत्या घटनांबाबत अखिल भारतीय जनवादी महिला संघटना गंभीर चिंता व्यक्त करीत आहे. नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका नराधमाने साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला ठार मारले. मुलीच्या वडिलांशी असलेल्या वैमनस्यातून सूड बुद्धीने त्याने हे भयानक कृत्य केल्याचे समजते.
इतक्या सहजपणे आरोपी एका कोवळ्या बालिकेवर इतका भयानक अत्याचार करू धजतो, याचा अर्थ गुन्हेगारांना पोलिस, प्रशासन आणि न्यायव्यवस्थेची जराही भिती उरलेली नाही, हे स्पष्ट आहे. हे वास्तव अत्यंत गंभीर आहे. एवढेच नव्हे तर अलिकडील महिलांवरील अन्याय, अत्याचारांच्या बहुतेक घटनांमध्ये गुन्हेगारांचा सत्ताधारी वर्तुळाशी असलेला संबंध, त्यात पोलीसांचा सहभाग आणि यातून एक प्रकारे गुन्हेगारांशीच आलेली हातमिळवणी दिसून येते. फलटण, पुणे व अन्यत्रही घडलेल्या घटनांतूनही हे समोर आले आहे. गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या पोलीसांची ही "कार्यक्षमता" अत्यंत गंभीर आहे, असे अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेला वाटते.
पुरूषाशी असलेल्या शत्रुत्वाचा सूड त्याच्या पत्नीवर किंवा मुलीवर लैंगिक अत्याचार करून उगवण्याची मनुवादी पितृसत्ताक मानसिकता समाजात किती रूजली आहे, हेच या घटनेतून स्पष्ट होते. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ सारख्या पोकळ घोषणा देणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विचारातील मनुवादी मानसिकताही प्रत्यक्षात महिला/मुलींना अधिकच असुरक्षित बनवत आहे. स्वतःच्या घरात सुरक्षित नसलेल्या मुलींची घराबाहेर काय अवस्था असावी, याची कल्पनाही करवत नाही.
गुन्हा घडल्यानंतर आरोपी कोणीही असला तरी त्याला सोडणार नाही, अशा वल्गना सत्ताधाऱ्यांकडून केल्या जातात. परंतु प्रत्यक्षात मात्र गुन्ह्यांची चौकशी होऊन खऱ्या आरोपीला शिक्षा मिळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यापेक्षा ताब्यात घेतलेल्या प्रथमदर्शनी आरोपीचा एन्काऊंटर करून वरवर न्याय दिल्यासारखे दाखवणे आणि प्रत्यक्षात मात्र पुरावाच नष्ट करणे, सत्ताधाऱ्यांना अधिक सोयीचे आहे. बदलापूरच्या शाळेतील मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे एन्काऊंटर केल्यानंतर, ताबडतोब कोणतीही चौकशी न करता तत्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी गुन्हेगाराला योग्य शिक्षा मिळाली असे म्हणून त्या घटनेचे स्वागत केले. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण, पुणे, रायगड, कल्याण, मराठवाड्यातील अनेक प्रकरणे ही सुरुवातीची चर्चा झाल्यावर विस्मरणात जातात. आणि आरोपी उघड माथ्याने फिरतात. यातूनच गुन्हेगार बेदरकार होतात आणि सामान्य जनता, विशेषतः महिला अधिकच कोशात जातात. निवडणुकांच्या तोंडावर मतदार म्हणून महिलांच्या तोंडावर काही पैसे फेकण्यापेक्षा त्यांना सुरक्षा पुरवणे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. नाहीतर बदलापूर, मालेगावच्या घटनांप्रमाणे जनता रस्त्यावर उतरून आरोपीला चौकात फाशी देण्यासारख्या आततायी मागण्या करतच राहणार असे मत जनवादी महिला संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा हेमलता पाटील यांनी व्यक्त केले.
मालेगाव घटनेतील आरोपीची लवकरात लवकर चौकशी करून त्याला कायद्याप्रमाणे कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटना करीत आहे.अशा शब्दात अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
जनवादी महिला संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा हेमलता पाटिल, अध्यक्षा सविता पाटील, सेक्रेटरी धनवंती भगत,खजिनदार लता पाटील, प्रमिला म्हात्रे, गीता पाटील, नयना म्हात्रे, उषा म्हात्रे, धनवंती भगत, कुंदा पाटील,रजनी पाटील, करूणा घरत, शारदा ठाकुर, माई ठाकूर,अपर्णा म्हात्रे, जयवंती पाटील जयश्री माळी आदी महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मालेगाव मधील लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध केला आहे.