उरण : २ डिसेंबर २०२५ रोजी उरण नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार असून उरण नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपने प्रचाराचा नारळ फोडला असून शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर संध्याकाळी उरणमधील बोरी पाखाडी परिसरात भाजपची पहिली जाहीर सभा आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या सभेला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा कोळी-शहा, प्रभाग क्र. २ च्या उमेदवार रिबेका मढवी, नंदकुमार लांबे, प्रभाग क्र.३ चे नम्रता ठाकूर, सुरेश शेलार, प्रभाग क्र.४ चे संदीप पानसरे, रोशनी थळे, माजी नगराध्यक्ष रवि भोईर, पनवेल मनपाचे माजी नगरसेवक मुकीत काझी, भाजपा अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष रेहान तुंगेकर, माजी नगरसेवक कौशिक शहा, रमझान खान, सलाम खान, वारिस मुल्ला, शाही मोहम्मद खान, बाशिध अली, हैदर मुकरी यांच्यासह मुस्लिम बांधवांसह आणि उत्तर भारतीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणुका जवळ आल्याने आता राजकीय फैरी झाडल्या जात आहेत.दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुस्लिम मतदारांसाठी भाजपने उर्दू भाषेतील प्रचारपत्रके वाटल्यानंतर मनसे आणि महाविकास आघाडीने जोरदार टीका केली होती. संपूर्ण राज्यात या उर्दू पत्रकाची चर्चा रंगली असताना, आमदार महेश बालदी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. उरण बोरी येथील मुस्लिम बांधवांच्या जाहीर प्रचारसभेत आमदार महेश बालदी यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार करत त्यांचा खरपूस समाचार घेतला. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना बोरीतील मुस्लिम बांधवांच्या सभेत आमदार बालदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.“उर्दू भाषेत प्रचारपत्र छापणे गुन्हा आहे का? ज्या मनसेने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला, त्यांनी सरळ सांगावं की त्यांना मुस्लिम मतं नकोत. तुम्हाला उर्दू शेरोशायरी, उर्दू गझला चालतात, मग उर्दू पत्रकाची अडचण का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, “भाजपला उर्दूची काहीही अॅलर्जी नाही. या देशातील मुस्लिम जो ‘भारत माता की जय’ म्हणतो आणि देशासोबत उभा राहतो, तो आमचा भाऊ आहे. उरणमध्ये हिंदू-मुस्लिम एकोप्याची परंपरा आहे आणि वेळप्रसंगी सर्वजण खांद्याला खांदा लावून उभे राहतात.
उरणमध्ये गेल्या २० वर्षांपासून मुस्लिम समाज भाजपसोबत असल्याचा दावा करत बालदी म्हणाले, “आमचे तीन नगरसेवक मुस्लिम आहेत. विकास हा आमचा धर्म आहे, सर्व समाजांना सोबत घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत. त्यामुळे अशा टीकांना मी घाबरत नाही." हाउसफुल प्रतिसादात झालेल्या या पहिल्या सभेमुळे प्रचाराची जोरदार सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. “ज्यांना उरणचा विकास अभिप्रेत आहे, असे सर्व हिंदू-मुस्लिम बांधव प्रचारात सहभागी झाले आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा मला पूर्ण विश्वास आहे,” असे आमदार बालदी यांनी स्पष्ट केले.यावेळी जाहीर सभेला पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.