सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ठाकरेंशी फारकत घेणाऱ्या काँग्रेससोबत जाण्यास शरद पवारांचा नकार, राज-उद्धवशी युती करण्याचे संकेत
  • काँग्रेस हायकमांडचा आदेश काहीही असो, शिवसेना-मनसे आधीच एकत्र, कुणाच्या परवानगीची गरज नाही; संजय राऊतांचा टोला
  • मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई; घेतलेले पैसे वसूल होणार!
 जिल्हा

नागरिकांनी सजग आणि सतर्क राहून देश सुरक्षेचे कान आणि डोळे व्हावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    24-11-2025 12:52:09

मुंबई – दहशतवादाविरुद्धचे युद्ध संपलेले नाही. या दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग आणि सतर्क असले पाहिजे. कान आणि डोळे बनून सुरक्षेचे काम केले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दिवीजा फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल पीस ऑनर कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख डॉ. सदानंद दाते, एनएसजी कमांडो सुनिल जोधा, रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांना ग्लोबल पीस ऑनर सन्मानाने गौरवण्यात आले.

26/11 या काळजाला भिडणाऱ्या घटनेला 17 वर्षे झाली असली तरी त्या दिवसाची वेदना आजही आपणा सर्वांच्या मनात कायम असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईसह देशभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या हल्ल्यातील शहीदांना आदरांजली देण्यासाठी आणि हुतात्म्यांच्या स्मृती ताज्या ठेवण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. पहलगाम येथे निष्पाप नागरिकांची हत्या करून दहशतवादी संघटना देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा घटनांवरून आजही दहशतवादाचा धोका कायम असल्याचे स्पष्ट होत असून, प्रत्येक नागरिकाने सतर्क राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 26/11 चा हल्ला हा ताज किंवा मुंबईपुरता मर्यादित नव्हता. जसा अमेरिका ’ट्विन टॉवर’ हल्ला म्हणजे अमेरिकेच्या सार्वभौमत्वावरील हल्ला होता, तसाच 26/11 चा हल्ला हा संपूर्ण भारताच्या सार्वभौमत्वाला दिलेला मोठा धक्का होता. त्या काळात ठोस प्रतिउत्तर दिले असते तर कदाचित पुन्हा असा हल्ला झाला नसता. परंतु आता परिस्थिती बदलली असून भारत मजबूत, सक्षम आणि निर्णायक देश म्हणून जगासमोर उभा आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई करत जगाला आपली क्षमता दाखवून दिली. भारत निर्णायक कारवाई करणारा देश आहे. आज देशाची सुरक्षा यंत्रणा अत्यंत मजबूत झाली आहे. दिल्ली बॉम्बस्फोटापूर्वी सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात स्फोटक पदार्थ आणि शस्त्रे जप्त करून मोठा कट उधळून लावला आहे.

दहशतवादी सरळ युद्ध करू शकत नाहीत म्हणून छुपे युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीत देशातील प्रत्येक नागरिकाने सतत जागरूक राहणे गरजेचे आहे. आजच्या दिवशी शहीद हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, तुकाराम ओंबाळे, मेजर उन्नीकृष्णन आणि प्रकाश मोरे यांसह सर्व शूरवीरांना विनम्र अभिवादन करतो.

“मुंबईची संस्कृती खंबीर आहे; ती थांबत नाही, खचत नाही” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 26/11 हल्ल्यात मुंबईची संस्कृती, तिचा आत्मा आणि तिची ओळख लक्ष्य करण्यात आली होती. पण मुंबई थांबली नाही आणि खचली नाही. आपण या हल्ल्याला ठाम प्रत्युत्तर दिले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला दिलेले उत्तर हे देशाच्या बदललेल्या सामर्थ्याचे द्योतक आहे.सदानंद दाते आणि नीता अंबानी यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी सांगितले की, “अशा व्यक्तींचा देशाला अभिमान आहे.”

कार्यक्रमात 26/11 हल्ल्यात अतुलनीय धैर्य दाखवणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख डॉ. सदानंद दाते यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कामा रुग्णालयातील ग्रेनेड हल्ल्यात गंभीर जखमी असूनही त्यांनी मागे न हटता अतिरेक्यांचा सामना केला आणि त्यांचा शेवट केला.

शांतीदूत म्हणून काम करत असलेल्या आणि समाजामध्ये सकारात्मकता निर्माण करणाऱ्या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच 26/11 हल्ल्यात अतुलनीय शौर्य दाखवणारे आणि ‘जिंदा शहीद’ म्हणून ओळखले जाणारे सुनिल जोधा यांनाही गौरवण्यात आले. श्री जोधा यांनी या हल्ल्यावेळी शरीरावर 20 गोळ्या झेलल्या ज्यातील एक आजही त्यांच्या शरीरात आहे.

या कार्यक्रमामध्ये पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनाही सन्मानित करण्यात आले तसेच 26/11 या हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांनाही सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास, नाविन्यता आणि रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, मुकेश अंबानी, यांच्यासह बॉलिवूड मधील कलाकार आणि मान्यवर उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती