नागपूर : झपाट्याने बदलत असलेल्या जगात ज्ञान आणि तंत्रज्ञानासोबतच समृद्ध विचारही महत्त्वाचे आहेत. या साऱ्यांचे स्त्रोत पुस्तके आहेत. ज्ञानाचे हे भांडार सर्व ज्ञानशाखात समृद्ध होण्यासमवेत वाचनसंस्कृतीलाही चालना मिळायला हवी, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.राष्ट्रीय पुस्तक न्यास न्यास आणि झिरो माईल युथ फाऊंडेशनच्या वतीने रेशीमबाग मैदानावर आयोजित नागपूर पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष प्रो. मिलिंद मराठे आणि झिरो माईल युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अजय संचेती यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
वाचनसंस्कृती निव्वळ मनोरंजन म्हणून केलेल्या वाचनातून घडत नाही. वाचनात विचार आणि व्यक्तिमत्व घडविण्याचे सामर्थ्य आहे. माझ्या लहानपणी वाचलेल्या अनेक पुस्तकांमधून माझ्या विचारांवर व मनावरही संस्कार घडलेले आहेत. पुस्तकांचा आपल्या विचारांवर, जीवनावर प्रभाव पडतो, ही बाब लक्षात घेतली पाहिजे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.आज आमचा देश विश्वगुरु होण्याची मनीषा बाळगतो तो ज्ञानाच्या आधार हे आपण लक्षात घेतले पाहिजे. वाचनातून ज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास प्रवाहित होतो. नव्या पिढीपर्यंत वाचन संस्कृतीचे बळ पोहोचायला हवे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
भारतीय मूळ परंपरा ही ज्ञान आणि वाचनावर भक्कम – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
इतिहासाचे दाखले लक्षात घेता भारतीय मूळ परंपरा ही ज्ञानावर आधारित राहिली आहे. मध्यंतरीचा काही काळ सोडला, तर ही ज्ञानाची परंपरा कायम राहिली आहे. या परंपरेत वाचनसंस्कृतीचे स्वतःचे महत्त्व आहे. हे महत्त्व लक्षात घेता वाचनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणे गरजेचे आहे असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पुण्यात मागील तीन वर्षांत आयोजित करण्यात आलेल्या अशा पुस्तक महोत्सवांना वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. अक्षरशः कोट्यवधींच्या पुस्तकांची उलाढाल झाली. यावर्षी तर ८०० स्टॉल्स बुक झाले आहेत. वाचन संस्कृतीच्या दृष्टीने हे आशादायी चित्र असल्याचे ते म्हणाले.याप्रसंगी उपस्थित श्रोत्यांपुढे बोलताना प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी यांनी अगदी काल्पनिक विषयांसह सर्व प्रकारची पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला. वाचनाच्या माध्यमातून आपले विचार घडतील, प्रगती साधण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
या पुस्तक महोत्सवाच्या जोडीला झिरोमाईल लिटरेचर फेस्टिव्हल तसेच सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजनही करण्यात आल्याची माहिती यावेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मराठे यांनी दिली. नऊ दिवस चालणारा हा पुस्तक महोत्सव खऱ्या अर्थाने नागपूरकरांचा उत्सव असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी पुस्तक महोत्सवातील विविध दालनांना भेट देऊन पुस्तकांची माहिती घेतली. पुस्तक महोत्सवातील बाल मंडपात गडकरी यांच्या हस्ते लहान मुलांना पुस्तके भेट देण्यात आली. देशभरातील सुमारे तिनशे प्रकाशक या पुस्तक महोत्सवात सहभागी झाले आहेत. हे प्रदर्शन ३० नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.