नाशिक : जिल्ह्यातील दिंडोरी आणि पेठ तालुक्यातील जलसंधारणाचे प्रश्न संबंधित विभागांच्या समन्वयाने तातडीने मार्गी लावावेत, अशा सूचना अन्न औषध प्रशासन व विशेष साहाय मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी मंत्री झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली दिंडोरी व पेठ परिसरातील रोजगार हमी योजनेमधील वनहरकतीमधील बंधारे वगळणे, गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार, लघुपाटबंधारे योजना देहरेच्या भूसंपादनाबाबतची सद्य:स्थिती, पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आदी विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक राकेश सेपट (पूर्व), सिद्धेश सावर्डेकर (पश्चिम), जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे (रोहयो), तहसीलदार मुकेश कांबळे (दिंडोरी) आदी उपस्थित होते.
मंत्री झिरवाळ म्हणाले की, दिंडोरी आणि पेठ या तालुक्यांसाठी सिंचनाचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. या दोन्ही तालुक्यात पावसाळ्यात मुसळधार पाऊस होतो. मात्र, पावसाळ्यानंतर पाण्याअभावी अनेकजण स्थलांतर करतात. या परिसरातून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी ग्रामस्थांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यास त्यांचे स्थलांतर थांबेल. त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रभावीपणे उपाययोजना कराव्यात. गाळमुक्त धरण योजनेच्या माध्यमातून काढण्यात येणारा गाळ शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा. त्यामुळे या भागातील शेतजमीन सुपीक होण्यास मदत होईल. तसेच गाळ काढल्यानंतर प्रकल्पांची सिंचन क्षमता वाढण्यास मदत होईल. तसेच तालुक्यातील रस्त्यांची दुरूस्ती, मजबुतीकरण तातडीने करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिलेत.जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, दिंडोरी व पेठ तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी विभागांकडे पाठपुरावा करण्यात येईल. अधिकाऱ्यांनी तातडीने सदरचे प्रश्न मार्गी लावाव्यात, अशाही सूचना त्यांनी केल्या.