उरण : नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षांमार्फत उभ्या असलेल्या भावना घाणेकर यांच्या सोशल मीडियाचा जोरदार इम्पॅक्ट बघायला मिळत आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओ बघून नगरपरिषद खडबडून जागा झालेलं पहायला मिळत आहे. सध्याच्या युगात सोशल मीडिया जबरदस्त काम करतो. जे काम विविध निवेदने देऊन, मागण्या करून होत नाही ते काम सोशल मीडियावरील एक व्हिडिओ किंवा पोस्ट करते. याचा प्रत्यय उरण शहरातही आला आहे. महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षांमार्फत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी काही दिवसांपूर्वी शहरातील साचलेल्या कचऱ्याचा व्हिडिओ टाकला होता तसेच मोरा भागात फायर स्टेशनचा डंपिंग ग्राउंड सारखा वापर केला जात असल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले होते.
हे व्हिडिओ पाहताच नगरपरिषद प्रशासन खडबडून जागे झाल्याचे आपल्याला पहायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपूर्वी नगरपरिषदेने ठिकठिकाणी साचलेला कचऱ्या उचलण्याचे काम हाती घेतले आहे तर मोरा येथील फायर स्टेशन येथे साठवला जात असणारा कचराही जेसीबी मार्फत उचलण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान उमेदवार भावना घाणेकर यांनी या पुढे असेच व्हिडिओ तयार करून नगरपरिषदेची पोलखोल करणार असल्याचा इशारा सत्ताधारी पक्षांना दिला आहे तसेच पद नसताना हे काम करून दिले आहे. पद मिळाल्यास या परिसरात आणखी बदल करू असे आश्वासन देत त्यांनी उरणकरांना त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.