नागपूर : वन विभागाशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी 25 नोव्हेंबर रोजी नागपूर येथील हरिसिंग सभागृहात वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली. या प्रसंगी पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या समुदायाभिमुख उपक्रमांचे तसेच त्या माध्यमातून तयार होणाऱ्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचे सर्वांनी स्वागत केले.या बैठकीस प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) श्रीनिवास राव; प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) व मुख्य वन्यजीव रक्षक एम. श्रीनिवास रेड्डी तसेच इतर वरिष्ठ वन अधिकारी उपस्थित होते. स्थानिक समुदायांचे जंगलावरचे अवलंबित्व कमी करणे आणि त्यांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देणे या उद्देशाने पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या प्रदर्शनाद्वारे वनमंत्री नाईक यांना स्थानिक समुदाय आणि महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची माहिती देण्यात आली
पवनी एकसंघ नियंत्रण वनपरिक्षेत्रांतर्गत आकर्षक गोधड्या, तसेच पर्यावरणपूरक गणपती मूर्ती व दिवे, पश्चिम पेंच, कोलितमारा क्षेत्रांतर्गत तेराकोटा मातीपासून बनविलेली सुबक शिल्पकला आणि आभूषणे, नागलवाडी एकसंघ नियंत्रण वनपरिक्षेत्रांतर्गत आवळेघाट येथील ‘शिवराज्य डेअरी’ मध्ये तयार होणारे ‘पेंचअमृत’ शुद्ध देशी तूप, पेढे, खवा, कापडी पिशव्या; तसेच सुवरधारा येथील महिला बचत गटांमार्फत राबविण्यात येणारे कापडी पिशव्या व इतर शिलाई प्रकल्प या विषयीची माहिती देण्यात आली.
वनमंत्री श्री. नाईक यांनी पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने राबविलेल्या या उपक्रमांचे कौतुक करत, हे उपक्रम स्थानिक समुदायविकास आणि रोजगारनिर्मितीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केले. हे प्रदर्शन क्षेत्र संचालक श्रीलक्ष्मी, उपसंचालक अक्षय गजभिये तसेच सहाय्यक वनसंरक्षक पूजा लिंबगांवकर व संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान देवळापार वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजीत इलमकर लिखित “Rhythms of the Wild – Voice of the Unheard” या काव्यसंग्रहाचे अनावरण वनमंत्री श्री. नाईक तसेच उपस्थित वरिष्ठ वन अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.