सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
  • : राणीच्या बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू, श्वसननलिकेत हाड अडकलं, उपचार न मिळाल्याने जीव सोडला?
  • नागपूरच्या काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त, भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
  • राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर भविष्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा
  • मुंबईत 11 लाख दुबार मतदार, निवडणूक आयोगाने केलं मान्य एका व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा, ठाकरे बंधूंचा दावा खरा ठरला
 व्यक्ती विशेष

‘आयआयटी बॉम्बे’ की ‘आयआयटी मुंबई’? केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या वक्तव्याने वाद पेटला; मनसे आक्रमक

डिजिटल पुणे    26-11-2025 17:13:28

मुंबई : आयआयटी मुंबई (IIT Mumbai) की आयआयटी बॉम्बे (IIT Bombay)? नावाच्या या जुन्या वादाला केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा उधाण आलं आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई आयआयटीतील एका कार्यक्रमात त्यांनी, “आयआयटी बॉम्बेचे नाव बदलून आयआयटी मुंबई केले नाही, यासाठी देवाचे आभार”, असं वक्तव्य केलं. त्यानंतर बॉम्बे विरुद्ध मुंबई हा वाद पुन्हा पेटला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

मुंबई विरुद्ध बॉम्बे... मुंबईला बॉम्बे म्हणून संबोधणाऱ्याचा विरोध या आधी आक्रमकपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. 2009 साली प्रदर्शित झालेल्या "वेक अप सीड" या चित्रपटात मुंबई ऐवजी बॉम्बे शब्द अनेकदा उच्चारला गेला. यावर मनसेने आक्षेप घेत कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर या प्रकरणात करण जोहरला माफी मागावी लागली.

या प्रकरणानंतर अनेकदा बॉम्बे विरुद्ध मुंबई असा वाद पाहायला मिळाला तेव्हा मनसेने प्रखरपणे भूमिका मांडली. आता केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या ताज्या वक्तव्यानंतर हा वाद पुन्हा एकदा वाढलाय.

मनसेची तत्काळ प्रतिक्रिया

केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर जोरदार प्रतिक्रिया दिली. “सरकारला मुंबई हे नाव खटकतंय. मुंबईऐवजी बॉम्बे नाव पुन्हा रूढ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर मुंबई तसेच संपूर्ण एमएमआर गुजरातला जोडण्याचा प्रयत्न आहे. मराठी माणसांनी हे ओळखायला हवं”, अशी टीका त्यांनी केली.मनसे कार्यकर्त्यांनी रातोरात आयआयटी मुंबईच्या गेटसमोर ‘आयआयटी बॉम्बे नाही, आयआयटी मुंबई’ अशा घोषणा असलेले बॅनर लावून निषेध नोंदवला.

आधीही पेटला होता ‘मुंबई विरुद्ध बॉम्बे’ वाद

मुंबईला बॉम्बे म्हणण्याचा विरोध मनसेने यापूर्वीही आक्रमकपणे केला आहे. 2009 मधील ‘वेक अप सिड’ या चित्रपटात ‘बॉम्बे’ शब्दाचा वापर केल्यानंतर मनसेच्या आंदोलकांनी चित्रपट निर्माते करण जोहर यांच्याकडून माफी मागण्यास भाग पाडले होते.

नेमकं काय म्हणाले जितेंद्र सिंह?

राष्ट्रीय क्वांटम मोहिमेअंतर्गत फॅब्रिकेशन अँड सेंट्रल फॅसिलिटीच्या उद्घाटनासाठी ते आयआयटी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी,“जसं आयआयटी मद्रासचं नाव कायम राहिलं, तसंच आयआयटी बॉम्बेचं नाव बदललं गेलं नाही याचा आनंद आहे”, असं विधान केलं.यावरून नावाबाबतची चर्चा पुन्हा राजकीय वर्तुळात झळकू लागली आहे.

नाव बदलणं कितपत शक्य?

आयआयटी बॉम्बे हे संसदेच्या कायद्याने स्थापन झालेले संस्थान आहे. त्यामुळे नाव बदलायचं असल्यास संसदेतील कायद्यात सुधारणा करावी लागेल. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत असलेल्या करारांमुळेही हा बदल सहज शक्य नाही, अशी माहिती समोर येते.

मुंबईतील राजकारण तापलं

केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आणि बॉम्बे विरुद्ध मुंबई हा वाद वाढला. मनसेकडून रात्री मुंबई आयआयटीच्या गेटसमोर आयआयटी बॉम्बे नाही आयआयटी मुंबई असे बॅनर लावण्यात आले. यावर भाजपच्या नेत्यांनी सुद्धा राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.आयआयटी बॉम्बेचं नाव लगेच तातडीने आयआयटी मुंबई करून बदलणे जरी शक्य नसलं तरी मुंबई आणि बॉम्बे संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर ही मागणी आता जोर धरू लागली आहे. त्यामुळे मुंबई आणि बॉम्बेच्या या वादामध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणसुद्धा तापलेलं पाहायला मिळतंय.


 Give Feedback



 जाहिराती