सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: ठरलं! मुंबईसह 6 महापालिकेच्या निवडणुका उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र लढणार
  • राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षणाबाबत आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
  • शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
  • 'मराठी भाषेवरून होणारं राजकारण, सक्तीसाठीचा हिंसाचार चुकीचा, पण...'; सुनील शेट्टीचं स्पष्ट मत
 जिल्हा

घणसोली येथील श्री देवकादेवी मंदिर परिसराला सिडकोने दिलेली नोटीस बेकायदेशीर, विश्वस्त मंडळ जाणार कोर्टात

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    28-11-2025 14:15:53

उरण : सिडकोने नवी मुंबई परिसरातील अनेक जागेवरील अनधिकृत बांधकामे यांना कायदेशीर नोटीस पाठवून ते बांधकामे, जमिनीवरील अतिक्रमणे हटवावीत असे आदेश दिले आहेत. अशाच प्रकारचा आदेश सिडको प्रशासनाने १९३६ साला पासून अस्तित्वात असलेल्या प्लॉट नंबर १० ए, सेक्टर ११, घणसोली, नवी मुंबई येथील श्री देवकादेवी मंदिर व मंदिर परिसराच्या भोवताली असलेल्या ६४ गुंठे परिसराला अनधिकृत ठरवत या जमिनीवरील अतिक्रमणे हटवावीत. व जागेवरील ताबा सोडावा अशी नोटीस सदर मंदिराच्या विश्वस्त मंडळाला दिले आहेत.

या नोटीसीमुळे श्री देवकादेवी सेवाभावी मंडळ घणसोली गाव व ग्रामस्थ यांच्या मध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. मंडळाच्या विश्वस्तांनी व ग्रामस्थांनी श्री देवकादेवी मंदिर व परिसरातील ६४ गुंठे परिसरावर सिडकोने कोणतेही कारवाई करू नये १९३६ पासून अस्तित्वात असलेल्या मंदिराला व आजूबाजूच्या ऐतिहासिक व धार्मिक परिसराला कायदेशीर मान्यता द्यावी अशी मागणी केली आहे. सिडको तर्फे या जमिनीवर, मंदिरावर कारवाई झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मंदिराच्या विश्वस्त मंडळानी व ग्रामस्थांनी सिडको प्रशासनाला दिला आहे.

मंदिरावर सिडको प्रशासनाने कारवाई करू नये, मंदिराला कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी मंदिराच्या विश्वस्त मंडळानी वनमंत्री गणेश नाईक, विभागीय कोकण आयुक्त, आमदार मंदाताई म्हात्रे, व्यवस्थापकीय संचालक सिडको प्रशासन, वरिष्ठ नियोजनकार (उत्तर )सिडको, मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकाम विभाग सिडको बेलापूर आदी ठिकाणी पत्रव्यवहार सुद्धा केला आहे. या प्रश्नावर मंत्री गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, सिडको प्रशासन कोणती भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

भारतीय राज्यघटना कलम २५ नुसार नागरिकांना धार्मिक व्यवहार, पूजा परंपरा स्वातंत्र्याने करण्याचा अधिकार आहे. मंदिर हटविणे किंवा अडथळा निर्माण करणे हा अधिकारांचा पायमल्ली ठरते. कलम २६ नुसार धार्मिक संस्थांना त्यांचे व्यवहार स्वयंपूर्णपणे चालविण्याचा अधिकार आहे. मंदिर व त्याची जागा व त्याचे व्यवस्थापन ट्रस्ट किंवा पूजा करणाऱ्या समाजाचे आहेत. सरकार /प्राधिकरण परंपरांगत जमिनीवर मनमानी हक्क सांगू शकत नाही.

कलम २९ व ३० नुसार मंदिरासारखी ऐतिहासिक सांस्कृतिक स्थळे सांस्कृतिक वारशात मोडतात. त्यामुळे या मंदिराचे शासनाने संरक्षण करणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५०(बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट )नुसार नोंदणीकृत किंवा परंपरांगत देवस्थानाची संपत्ती खाजगी अथवा सरकारी संस्था कब्जा करू शकत नाही. ७५ वर्षापेक्षा जास्त जुने धार्मिक स्थळ संरक्षित, सांस्कृतिक वारसा मध्ये मोडण्याची तरतूद आहे. त्यामुळे शासनाने या मंदिरावर व मंदिर परिसरातील ६४ गुंठे जागेवर कारवाई करणे चुकीचे आहे.असे मत प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व गावठाण चळवळीचे अभ्यासक राजाराम पाटील यांनी मांडले.

मौजे घणसोली, सेक्टर ११, प्लॉट नं. १०ए, येथे सन १९३६ सालापासून "श्री देवकादेवी मंदिर" अस्तित्वात असून हे ग्रामस्थांचे परंपरागत ऐतिहासिक व धार्मिक केंद्र आहे.मंदिरासोबतच्या सुमारे ६४ गुठे परिसरात जुनी वृक्ष  सांस्कृतिक वारसा आहे मंदिरावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता ती संपूर्ण जागा मंदिर ट्रस्टच्या नावावर देण्यात यावी याबाबत शासनाच्या सर्वच विभागात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आम्ही स्थानिक भूमीपुत्र आहोत. आमच्या वंशपरंपरागत व वारसा नुसार चालत आलेल्या जमिनीवर, मंदिरावर जर कारवाई होणार असेल तर त्याला आम्ही कायदेशीररित्या विरोध करू. आमचा हक्क आमचा अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे. सिडको प्रशासनाने आम्हा स्थानिक भूमीपुत्रावर अन्याय करू नये अशी आम्ही विनंती करीत आहोत      

-भारत फुलचंद पाटील,श्री देवकादेवी सेवाभावी मंडळ, घणसोली गाव, नवी मुंबई


 Give Feedback



 जाहिराती