मुंबई : संविधानाबाबत जनजागृती आणि सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी संविधान दिन आणि भारतीय संविधानाच्या ७५ वर्षांच्या पूर्ततेचे औचित्य साधून विधि व न्याय विभागाच्या वतीने मंत्रालयात परिषद सभागृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.‘संविधान दिनाचे महत्त्व आणि प्रशासनात संविधानिक मूल्यांची प्रासंगिकता’ या विषयावर उप विधि सल्लागार-नि-उप सचिव विलास खांडबहाले यांनी मार्गदर्शन केले. विधि सल्लागार-नि-सह सचिव महेंद्र जाधव यांनी संविधानातील त्यासंबंधित उदाहरणे देऊन संविधानातील कलमांचे महत्त्व विशद केले. उप विधि सल्लागार-नि- उप सचिव सागर बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून प्रश्नमंजूषा सोडवून घेण्यात आली. या कार्यक्रमाला विधि व न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.