पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव मर्सिडीज कारने चार वर्षीय बालिकेला उडवल्याची गंभीर घटना शिरूरच्या बोऱ्हाडेमळा परिसरात पुणे–अहिल्यानगर महामार्गावर घडली. या अपघातात शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे (वय 4) ही बालिका गंभीर जखमी झाली आहे.
घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.
शुभ्रा महामार्ग ओलांडत असताना, वाघोलीहून शिरूरकडे प्रचारासाठी येत असलेल्या आमदार कटके यांच्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज (MH 12 1391) कारने धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बालिका चेंडूसारखी उडत काही फुटांवर जाऊन डांबरी रस्त्यावर पडली. तिचे दात पडणे, जबड्याला गंभीर दुखापत तसेच चेहऱ्याला खोल जखमा झाल्या आहेत, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बालिकेला शिरूरच्या वात्सल्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर तिला तातडीने पुण्यातील केएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
आमदार ज्ञानेश्वर कटके हे वाघोली येथून शिरूर नगरपरिषदेच्या प्रचारासाठी रविवारी दुपारी शिरूर येथे येत होते. बोऱ्हाडे मळा येथील हुंदाई शोरूम समोर शुभ्रा बोऱ्हाडे ही चार वर्षीय बालिका महामार्ग ओलांडत होती. एका कारच्या आडून ती अचानक आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज कार (क्र. एमएच१२, एनएक्स १३९१) समोर आली. ज्ञानेश्वर कटके यांच्या चालकाने जोरदार ब्रेक दाबला. परंतु गाडीच्या वेगामुळे शुभ्राला समोरासमोर जोराची धडक बसली. यात ती चेंडूसारखी उडून काही फुट अंतरावर डांबरी रस्त्यावर पडली. यात तिला गंभीर जखमी झाली. आमदार ज्ञानेश्वर कटके व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कारमधून खाली धाव घेत शुभ्रा हिला मदत करत उचलले आणि त्यांच्याच कारमधून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले.
पोलीस प्रशासनाची लपवाछपवी?
घटना घडताच संपूर्ण शिरूर शहरात “आमदार कटके यांच्या गाडीने बालिका जखमी” अशी चर्चा पसरली. तरीही पोलीस प्रशासनाकडून,“रुग्णालयाकडून आम्हाला कोणती माहिती मिळालेली नाही”“तक्रार देण्यासाठी कोणी आलेले नाही”अशा प्रतिक्रिया देण्यात येत होत्या.
यामुळे घटना दडपण्याचा प्रयत्न झाला का?,आमदारांच्या दबावामुळे पोलिसांकडून माहिती लपवली गेली का?याबाबत शहरात उघडपणे चर्चा सुरू आहे.