कर्नाटक : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी.एस. येडियुरप्पा यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या पॉक्सो प्रकरणाने पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 17 वर्षीय मुलीवरील कथित विनयभंगाच्या आरोपांनंतर हा खटला चर्चेत आला असून, तपास यंत्रणेने या प्रकरणात 750 पानांचे सविस्तर आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.मी बी.एस. येडियुरप्पा यांना चांगला माणूस मानत होतो, पण त्यांनी माझ्या मुलीशी अन्याय केला. मी माझ्या 17 वर्षांच्या बलात्कार पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. आमचे संभाषण ऐकल्यानंतर, त्यांनी माझ्या मुलीला एका खोलीत नेले आणि तिचा विनयभंग केला. माझी मुलगी कशी तरी त्यांच्यापासून पळून जाण्यात यशस्वी झाली आणि भीतीने थरथर कापत माझ्याकडे आली. येडियुरप्पा आणि या कृत्यात त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी माझी इच्छा आहे."
घडले काय?
पीडित मुलीच्या आईने 14 मार्च 2024 रोजी येडियुरप्पा यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तिचा दावा होता की तिने आपल्या मुलीवरील अत्याचारासंबंधी न्याय मिळावा म्हणून नेत्यांच्या घरी भेट दिली असता, येडियुरप्पांनी मुलीला खोलीत नेऊन तिचा विनयभंग केला. पीडित मुलगी कशीबशी पळून बाहेर आली, असा आरोप आईने केला होता.या प्रकरणानंतर पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, 26 मे 2024 रोजी फुफ्फुसाच्या कर्करोगावर उपचार सुरू असताना पीडितेच्या आईचे निधन झाले. तिच्या मृत्यूनंतर केस लढण्याची जबाबदारी तिच्या 26 वर्षीय मुलाने स्वीकारली आहे.
सीआयडीचा तपास आणि आरोपपत्र
कर्नाटक काँग्रेस सरकारने हा तपास सीआयडीकडे सोपवला. तपासात गुप्त व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल डेटा आणि साक्षीपत्रांच्या आधारे पुरावे जमा करण्यात आले. येडियुरप्पा यांच्यासह चार आरोपींविरुद्ध 750 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून यात लैंगिक अत्याचार, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि दडपशाहीचे आरोप आहेत.13 नोव्हेंबर रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने येडियुरप्पा यांची पॉक्सो खटला रद्द करण्याची मागणी फेटाळली. आता 2 डिसेंबर रोजी सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
येडियुरप्पा यांची बाजू
येडियुरप्पा यांच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळले असून हा खटला राजकीय हेतूने रचल्याचा दावा केला आहे.वकील सी.व्ही. नागेश यांनी म्हटले की,“महिलेचे आरोप खोटे आहेत.“ती फेब्रुवारीमध्ये अनेक वेळा पोलिस आयुक्तांना भेटली पण एकाही वेळी अशी तक्रार केली नाही.प्रसिद्ध व्हिडिओबद्दल त्यांनी सांगितले की मुलगी अस्वस्थ होऊन रडत असल्याने तिला घरात येऊ दिले होते.पीडित कुटुंबाचे म्हणणे आईच्या निधनानंतर मुलीचा भाऊ हा खटला पुढे चालवत आहे.त्याने सीसीटीव्ही फुटेज ,फोन मेमरी कार्ड ,हार्ड ड्राइव्ह आदी डिजिटल पुरावे तपास यंत्रणेला सादर केले आहेत.त्याने सोशल मीडियावर need4justice नावाचे पेज सुरू करून न्यायासाठी मोहीम सुरू केली आहे. त्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना वकिलाची नियुक्ती करून मदत करण्याची विनंती केली आहे.
आता पुढे काय?
2 डिसेंबर रोजी बेंगळुरू न्यायालयात होणारी सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे. 82 वर्षीय येडियुरप्पा यांना यानंतर अटकेचा धोका निर्माण होईल का? हा प्रश्न राज्याच्या राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे.