नवी दिल्ली/पुणे : 'राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड' (एनसीईएल), 'राष्ट्रीय सहकारी सेंद्रिय लिमिटेड' (एनसीओएल) आणि 'भारती बीज सुरक्षा व सेवा लिमिटेड' (बीबीएसएसएल) या तीन महत्त्वाच्या राष्ट्रीय सहकारी संस्थांमध्ये महाराष्ट्राचा सहभाग वाढत असून, त्याचा थेट लाभ राज्यातील शेतकरी व सहकारी संस्थांना होत असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज राज्यसभेत दिली. डॉ. अनिल बोंडे यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता.
मोहोळ म्हणाले, "देशातील आठ लाख सहकारी समित्यांपैकी सव्वा दोन लाख समित्या महाराष्ट्रात आहेत. देशाच्या सहकार क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे. एनसीईएल, एनसीओएल, बीबीएसएसएल या संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठा विस्तार होत आहे. 'एनसीईएल' आणि 'एनसीओएल'मध्ये राज्यातील अनुक्रमे अकराशे आणि तीनशेहून अधिक सहकारी संस्था सामील असून, बीबीएसएसएलशी पाच हजारांहून अधिक संस्था जोडल्या गेल्या आहेत."
महत्त्वाचे मुद्दे
* 'एनसीओएल'ने 'डॉ. पंजाबराव देशमुख कृषी मिशन'अंतर्गत 11 संस्थांसोबत सामंजस्य करार
* त्यामुळे सेंद्रिय हरभरा, तूर आणि इतर कृषी उत्पादनांच्या खरेदीस चालना
* 'एनसीईएल'मार्फत सहकारी संस्थांकडून केळी, कांदा, हळद, अनार आणि द्राक्ष यांसारख्या उत्पादनांची निर्यात
* 'बीबीएसएसएल'चे पारंपरिक बियाण्यांचे संरक्षण, संवर्धन आणि त्यांच्या प्रसारासाठी टिश्यू कल्चर प्रयोगशाळा उभारण्यावर मोठे काम
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकारातून समृद्धी या धोरणानुसार आणि गृह व सहकारमंत्री अमितभाई शाह यांच्या नेतृत्वात सहकार क्षेत्राला मजबूत आणि सक्षम करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली जात आहेत. या बहुराज्य सोसायट्यांना सक्षम करत त्याचे सकारात्मक परिणाम गावपातळीवरील संस्थांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय सहकारी संस्थांमुळे उत्पादनांना बाजारपेठ, निर्यात संधी, सेंद्रिय शेतीला चालना आणि स्थानिक बियाण्यांचे संरक्षण शक्य होत असल्याने शेतकऱ्यांना थेट फायदा होत आहे’.