नागपूर : विभागातील पदवीधर मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार यादी तयार करण्याचे काम सुरु असून ३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत प्राप्त अर्जांच्या आधारे आज नागपूर विभागाच्या मतदार नोंदणी अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत १ लाख ७ हजार २१ मदतारांची पहिली प्रारुप मतदार यादी आज प्रसिद्ध केली आहे. येत्या १८ डिसेंबर पर्यंत यासंदर्भात दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असून १२ जानेवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.मतदार नोंदणीची प्रक्रिया पुढील वर्षी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत सुरु राहणार असून मागील निवडणुकीपेक्षा यावेळी जास्त मतदारांची नोंद होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत श्रीमती बिदरी यांनी जास्तीत-जास्त पदवीधरांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन आज विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले. अपर आयुक्त तुषार मठकर, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे यावेळी उपस्थित होते.
विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या नागपूर विभागातील पदवीधर मतदार संघाचे सदस्य अभिजित वंजारी हे ६ डिसेंबर २०२६ रोजी निवृत्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर पदवी निकाल लागल्यापासून १ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ३ वर्ष पूर्ण झालेल्या पदवीधरांसह सद्या मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या सर्व पदवीधरांसाठी ३० सप्टेंबर २०२५ पासून नव्याने मतदार नोंदणी करण्यात येत आहे. ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत विभागातील ६ जिल्ह्यांमधून १ लाख १० हजार ९५६ अर्ज प्राप्त झाले. यापैकी ३ हजार ७४१ अर्ज त्रुटींमुळे रद्द झाले. अर्ज रद्द झालेल्या पदवीधरांना येत्या १८ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती घेता येणार आहे. या हरकतींवर निर्णय होवून १२ जानेवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे, श्रीमती बिदरी यांनी सांगितले. प्राप्त अर्जांपैकी ९१ हजार ६८९ अर्ज ऑफलाईन तर उर्वरित १९ हजार २६७ अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले. २०२० मध्ये पार पडलेल्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत २ लाख ६ हजार ४५४ मतदारांची नोंदणी झाली होती. यावर्षी एका महिन्यातच १ लाखांपेक्षा अधिक मतदारांची नोंदणी झाली असून मागील निवडणुकीपेक्षा यावेळी जास्त मतदारांची नोंदणी होणार असल्याचेही बिदरी म्हणाल्या.
जिल्हानिहाय झालेल्या अर्जाची नोंद
नागपूर विभागील ६ जिल्ह्यांमध्ये एकूण २५६ मतदान केंद्रांवर ६७ हजार ३१८ पुरूष आणि ३९ हजार ८९० महिला व इतर ७ अशा एकूण १ लाख १० हजार ९५६ पदवीधरांनी नोंदणी केली आहे. नागपूर जिल्ह्यात १ ते १३९ मतदान केंद्रावर ३६ हजार ४४२ अर्जांची नोंद झाली यातील १ हजार ४४५ अर्ज नामंजूर झाले तर उर्वरित ३४ हजार ९६७ अर्ज मंजूर झाले आहेत. भंडारा जिल्ह्यात १४० ते १५७ मतदान केंद्रावर १३ हजार ५२२ अर्जांची नोंद झाली यातील ५१४ अर्ज नामंजूर झाले तर उर्वरित १३ हजार ८ अर्ज मंजूर झाले आहेत.
गोंदिया जिल्ह्यात १५८ ते १७४ मतदान केंद्रावर १६ हजार २६८ अर्जांची नोंद झाली यातील ५२६ अर्ज नामंजूर झाले तर उर्वरित १५ हजार ७४२ अर्ज मंजूर झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात १७५ ते २०३ मतदान केंद्रावर १२ हजार ४२९ अर्जांची नोंद झाली यातील ५६७ अर्ज नामंजूर झाले तर उर्वरित ११ हजार ८६२ अर्ज मंजूर झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात २०४ ते २३९ मतदान केंद्रावर २१ हजार ९९ अर्जांची नोंद झाली यातील ३३८ अर्ज नामंजूर झाले तर उर्वरित २९ हजार ७६१ अर्ज मंजूर झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात २४० ते २५६ मतदान केंद्रावर ११ हजार २२६ अर्जांची नोंद झाली यातील ३५१ अर्ज नामंजूर झाले तर उर्वरित १० हजार ८७५ अर्ज मंजूर झाले आहेत.
प्राप्त अर्जातील नामंजूर झालेल्या अर्जदारांना १८ डिसेंबर २०२५ पर्यंत प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती स्वीकारून निकाली काढण्यात येतील. त्यानंतर १२ जानेवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया पुढील वर्षी नागपूर पदवीधर मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत नमुना १८ अर्ज तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत. ६ नोव्हेंबर २०२५ नंतर प्राप्त अर्ज हे पुरवणी स्वरूपात अंतिम यादी सोबत एकत्रितपणे संलग्न करण्यात येतील, असे बिदरी यांनी सांगितले.