मुंबई : वाळू घाटांच्या लिलावाकरिता पर्यावरण समितीकडून सर्व मंजुरी घेण्याची कार्यवाही पूर्ण करून राज्यातील वाळू घाटांचे लिलाव ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण करा तसेच वाळू धोरणात घरकुल बांधणीसाठी देण्यात येणारी कार्यवाही गतीने करण्याच्या सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.मंत्रालयात वाळू धोरणासंदर्भात बैठकआयोजित करण्यात आली होती.यावेळी या बैठकीत दूरदृश्यप्रणालीव्दारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, राज्यातील सर्व महसूल विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित होते.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, वाळू घाटांचे लिलाव विहित वेळेत होण्यासाठी महसूल अधिका-यांनी गतीने आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी. या लिलावासाठी पर्यावरण व महसूल विभागाने परस्पर सामंजस्य पध्दतीने काम करावे. पर्यावरण विभागाकडून मिळालेल्या परवानगीनंतर कोणताही विलंब न लावता वाळू घाटाचे लिलाव केले जावेत.वाळूचा अवैध उपसा व वाहतूक,चोरी होऊ नये यासाठी कायदेशीर काटेकोरपणे उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही त्यांनी केल्या.महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी विभागनिहाय व जिल्हानिहाय वाळू धोरणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.