पुणे : भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांच्या वतीने इस्कॉन मंदिर, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या आध्यात्मिक भेटीला विद्यार्थिनी आणि शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्या वर्षातील ४६४ विद्यार्थिनी आणि ३४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या प्रेरणादायी सफरीत सहभागी झाले.कार्यक्रमाची सुरुवात भक्ती वेदांत हॉलमध्ये झालेल्या हरे कृष्ण महामंत्राच्या गजराने झाली. त्यानंतर आयोजित विशेष सत्रात युगल प्रिया माताजी यांनी भगवद्गीतेतील मूल्यांवर आधारित मार्गदर्शन केले. शिस्त, ताण-तणाव व्यवस्थापन आणि जीवनध्येयांची जाणीव यांवरील त्यांचे विचार विद्यार्थिनींना प्रेरणादायी वाटले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांनी इस्कॉनच्या कृष्ण रूपा मॅडम यांना मानचिन्ह प्रदान केले. प्राचार्य डॉ. जाधव म्हणाले, “आध्यात्मिक अनुभव विद्यार्थिनींच्या मनात शिस्त, भक्ती आणि आत्मजाणीवेची बीजे रोवतात. तांत्रिक शिक्षणाइतकाच हा अनुभवही अनमोल आहे.”
सांस्कृतिक सत्राचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कु. श्रेया देशमुख यांनी केले. सादरीकरणांमध्ये कैवल्या बडदे हिचा भरतनाट्यम, खुशी सोनी हिची महाभारत कविता, जिज्ञा बोरवंकर हिचा कथक नृत्याविष्कार आणि साची पांडे हिचे भक्तिगीत यांचा समावेश होता. प्रत्येक सादरीकरणाने वातावरण भक्तिभावाने भारावले.

कार्यक्रमाच्या शेवटी कृष्ण रूपा मॅडम यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे हरे कृष्ण महामंत्राच्या आनंदमय नृत्यात सहभाग नोंदवला. त्यानंतर प्रसाद वितरणाने या सुंदर प्रवासाची सांगता झाली.या वेळी उपप्राचार्य डॉ. अविनाश पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. यशोमती धुमाळ, प्रा. महारुद्र कापसे आणि प्रा. कल्पेश अवरे यांनी केले. विद्यार्थिनींच्या उत्साही सहभागामुळे संपूर्ण उपक्रम सुरळीत संपन्न झाला.
या आध्यात्मिक उपक्रमाबद्दल भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम आणि आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप यांनी महाविद्यालयाचे विशेष अभिनंदन केले.इस्कॉन मंदिराची ही भेट विद्यार्थिनींसाठी आध्यात्मिक ऊर्जा, संस्कृती आणि शिक्षणाचा अद्भुत संगम ठरली. या दिव्य अनुभवाने त्यांच्या मनात भक्ती, शिस्त आणि जीवनमूल्यांची नवी ज्योत प्रज्वलित झाली.