पुणे : मनुष्यबळ विकास आणि संवर्धन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या 'ओन्ली एचआर फाउंडेशन'तर्फे वर्धापनदिन उत्सव शनिवार,दि.१३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स(बीएमसीसी महाविद्यालय रस्ता)येथील काळे हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून देशभरात बीज संवर्धनासाठी ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई सोमा पोपेरे उपस्थित राहणार आहेत.'ओन्ली एचआर फाउंडेशन'चा हा बारावा वर्धापन दिन आहे.
राहीबाई पोपेरे या महाराष्ट्रातील ख्यातनाम आदिवासी शेतकरी असून त्यांनी १०० पेक्षा अधिक स्थानिक बीजजाती जतन केल्या आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या समुदाय बीज बँकेच्या माध्यमातून तसेच सेंद्रिय आणि शाश्वत शेतीबाबत दिलेल्या प्रशिक्षणांमुळे हजारो शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले आहे. पद्मश्री आणि नारी शक्ती पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या राहीबाई यांची बीज संरक्षण आणि माती आरोग्य याबाबतची अभ्यासपूर्ण मांडणी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असेल.
या सोहळ्यात पाहुण्यांशी संवाद, मातीच्या आरोग्यावर प्रेरणादायी व्याख्यान, बीजविषयक ज्ञानाचे आदानप्रदान आणि नेटवर्किंग अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. फाउंडेशनच्या १२ वर्षांच्या कार्यातील शिक्षण, नेतृत्व आणि सामाजिक योगदान या मूल्यांचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.