नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सावजीसारखे तिखट आणि नागपुरी संत्र्यासारखे गोड आहेत. जराही चिडचिड न करता देवेंद्र फडणवीस अंगावर येणाऱ्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतात, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमेकांच्या पक्षाचे कार्यकर्ते फोडण्यावरुन वितुष्ट निर्माण झाल्याच्या चर्चा आहेत. या सगळ्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाहांकडे महाराष्ट्र भाजपची तक्रारही केल्याचे सांगितले जात होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. काल देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील भाषणाच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून शिंदे–फडणवीस यांच्यात कार्यकर्त्यांच्या घडामोडींवरून मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दिल्लीतील भेटींसह विविध राजकीय हालचालींमुळे दोघांमध्ये तणाव असल्याचे बोलले जात होते. मात्र, नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात शिंदे यांनी फडणवीसांची स्तुती करत सर्वांना आश्चर्यचकित केले. या कार्यक्रमात फडणवीस यांच्या विधानसभेतील भाषणांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
शिंदे म्हणाले, “देवेंद्रजींना टीका, ट्रोलिंग, टोमणे यांची पर्वा नसते. त्यांनी कधीही आरडाओरडा केला नाही. पण ज्यांना उत्तर द्यायचे असेल, त्यांना ते नेमके आणि ठाम उत्तर देतात. अंगावर आलेल्या विरोधकांचा ते ‘करेक्ट कार्यक्रम’ करतात.”ते पुढे म्हणाले, “बॉलीवूडमध्ये बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन; तर सभागृहातील बिग डी म्हणजे देवेंद्र फडणवीस. हा डी म्हणजे डेडिकेशन, डेरिंग, डिसिप्लिन, डिव्होशन आणि डिटरमिनेशन.”2022 मधील राजकीय घडामोडींचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, “त्या निर्णायक काळात फडणवीसांनी दिलेला खंबीर पाठिंबा मी पाहिलेला आहे. ते अनेकदा हुडी घालून मला भेटायला यायचे आणि त्यांच्या त्या हुडीने विरोधकांना हुडहुडी भरत होती.”
शिंदेंची आमदारांना ताकीद
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या आमदारांचे कान टोचले. सभागृहाच्या कामात जास्तीत जास्त सहभागी व्हा. कामकाज समजून घेत जा. मंत्र्यांनीही कुठे बाहेर जाण्याऐवजी सभागृहात बसून राहिले पाहिजे. आमदारांनी चर्चेत सहभागी झाले पाहिजे, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी आमदारांना दिला.