नागपूर : राज्यात लोकसंख्यानिहाय आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयापर्यंत बळकटीकरणावर भर देत दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी राज्याच्या बृहत आराखडा तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.विधान भवन येथे समिती कक्षात आरोग्य विभागाच्या बांधकामाधीन इमारतींचा आढावा बैठकीत आरोग्यमंत्री श्री आबिटकर बोलत होते.
आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले की, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात उभारण्यात आलेल्या आरोग्य संस्थांच्या इमारतींचा रुग्णसेवेत उपयोग करावा. मागणीप्रमाणे आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करण्यात यावे. आरोग्य संस्थांच्या इमारतींची अंदाजपत्रके तपासून घेण्यात यावीत. रुग्णालयांमध्ये स्वच्छता, रुग्णांना मिळणार आहार आणि मनुष्यबळ याबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. स्वच्छतेबाबत कटाक्षाने कारवाई करावी. स्वच्छतेच्या कामासाठी नियुक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्यावे. कामात व्यत्यय आणून काम बंद पाडणाऱ्या तसेच कामात कुचराई करीत असलेल्या कंत्राटदारांना काळे यादीत टाकावे संबंधित दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिले.ठाणे सामान्य रुग्णालयाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करून रुग्णालय रुग्णसेवेत रुजू करण्याचे निर्देशही आरोग्य मंत्री यांनी दिले.
बैठकीत संगमनेर (जि. नगर) येथील स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिवती ग्रामीण रुग्णालय (जि. चंद्रपूर), डागा रुग्णालय नागपूर, उमरेड उपजिल्हा रुग्णालय , प्राथमिक आरोग्य केंद्र सिरसी ता. उमरेड, प्राथमिक आरोग्य केंद्र नांद ता भिवापूर, कुही (जि नागपूर) ग्रामीण रुग्णालय, धाराशिव जिल्हा रुग्णालय, मलकापूर (ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर) येथील ग्रामीण रुग्णालय, पालघर जिल्ह्यातील मनोर ट्रॉमा केअर आणि अन्य रुग्णालयांचा कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार सर्वश्री विनय कोरे, प्रवीण दटके, कैलास पाटील, संजय मेश्राम, विलास तरे, आमदार देवराव भोंगळे, अमोल खताळ, शांताराम मोरे उपस्थित होते.तसेच संचालक डॉ नितीन अंबाडेकर, सहसंचालक श्री कंदेवाड यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.