नाशिक : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका आणि त्र्यंबकेश्वर नगर परिषदेने अग्निशमन दलाचे बळकटीकरण करून आग प्रतिबंधक अत्याधुनिक साधने या दलात समाविष्ट करून घ्यावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी सिंहस्थ कुंभमेळ्यातील अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा, साधुग्रामबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, स्मिता झगडे, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील आदी उपस्थित होते, तर ‘यशदा’चे विश्वास सुपनेरकर आदी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, कुंभमेळ्यानिमित्त भाविकांची संख्या मोठी असणार आहे. त्यादृष्टीने नाशिक महानगरपालिका आणि त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने नियोजन करणे आवश्यक आहे. साधूग्राम, तपोवन, टेन्ट सिटीसारखी गर्दीची आणि धार्मिक, पर्यटनस्थळे निश्चित करून तेथे तत्पर अग्निशमन दलाची सेवा मिळू शकेल, असे नियोजन करावे. त्यासाठी अत्याधुनिक वाहने, साधने आणि कुशल मनुष्यबळाचा वापर करावा. याबरोबरच रेस्क्यू व्हॅन, शीघ्र प्रतिसाद देणारी वाहने आणि अरुंद जागेतून जाऊ शकतील, अशीही वाहने अग्निशमन दलात समाविष्ट करून घ्यावीत.
याबरोबरच प्रथमोपचाराचे साहित्य या दलाजवळ राहील, असेही नियोजन करावे. कुंभमेळ्यानिमित्त अग्निशमन सेवेसाठी येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था करून घ्यावी. त्यासाठी लगतच्या जिल्ह्याशी संपर्क साधून माहिती घ्यावी. कुंभमेळ्यासाठी सुरू केलेल्या विविध विकास कामांना गती देतानाच ही कामे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार राहतील याची दक्षता संबंधित विभागांनी घ्यावी. नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे साधुग्रामचा विकास करताना सर्वसमावेशक गरजांचा त्यात समावेश
करून आराखडा सादर करावा, अशाही सूचना प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गेडाम यांनी देताना आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेच्या तयारीचा आढावा घेतला.कुंभमेळा आयुक्त श्री. सिंह, महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती झगडे यांनी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या तयारीची, तर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. पाटील यांनी नगरपरिषदेच्या तयारीची माहिती दिली.