पुणे : महिलांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित स्वच्छतागृह आणि नागरी सुविधांची मागणी 'एएसके ग्रुप लोक दरबार' (कोंढवा) या संस्थेतर्फे तर्फे महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली.काँग्रेस कार्यकर्त्या सौ.मुबीना अहमद खान यांनी हे निवेदन नवल किशोर राम यांच्याकडे दिले.महिलांना तातडीच्या तक्रारी मांडता याव्यात म्हणून कार्यक्षम हेल्पलाईन सतत उपलब्ध ठेवावी,अशी मागणीही सादर करण्यात आली.
कोंढवा-कौसरबाग भागात महिलांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित स्वच्छतागृह उभारणी आवश्यक आहे.महिलांच्या सुरक्षेसाठी महाविद्यालये,शाळा आणि गर्दीच्या ठिकाणी गस्त वाढवण्याची आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत ठेवण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.वाहतुकीच्या वाढत्या ताणामुळे महत्त्वाच्या चौकांमध्ये अतिरिक्त ट्रॅफिक कर्मचारी तैनात करणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.या भागातील वाहतूककोंडी, स्वच्छतेच्या समस्या, ध्वनीप्रदूषण आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या सुरक्षाविषयक अडचणी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. प्रशासनाने या सूचनांची त्वरित अंमलबजावणी करून शहरातील सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा एएसके ग्रुपने व्यक्त केली.