नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचा दिल्लीकरांना परिचय व्हावा यासाठी आयोजित महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती अत्यंत समृद्ध व वैशिष्ट्यपूर्ण असून तिचा जगभरात प्रचार प्रसार होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विष्णू मनोहर यांनी यावेळी केले.नवी दिल्ली येथील कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनात आयोजित या महोत्सवात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील महिला बचत गटांनी सहभाग घेतला आहे. 25 स्टॉल्सच्या माध्यमातून या खाद्यसंस्कृतीचा परिचय करून देण्यात आला आहे. कोकणातील सी-फूडपासून खास वैदर्भिय पदार्थांपर्यंत , पश्चिम महाराष्ट्रातील व खानदेश-मराठवाड्याच्या पारंपरिक डिशेसपर्यंत अनेक चविष्ट पदार्थ येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या उद्घाटन सोहळ्याला निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला, निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, उपअभियंता किरण चौधरी, आशुतोष द्विवेदी आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राची खाद्य संस्कृती जगभरात वैशिष्ट्यपूर्ण- विष्णू मनोहर
उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी मालवाच्या दैनंदिन जीवनातील अन्नाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीमध्ये विविधता ओतप्रोत भरलेली आहे. त्यामुळे प्राचीन काळापासून येथील खाद्य पदार्थ वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पोषणासोबतच समृद्ध जीवनशैलीसाठी महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती पूरकपोषक आहे. अशा महोत्सवाच्या माध्यमातून या अनोख्या खाद्य संस्कृतीचा प्रचार प्रसार व्हावा. भूक लागली आहे, तरीही आपण इतरांना देतो, ही आपली संस्कृती असल्याचे ही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील सात्विक आहाराचे महत्त्व सांगताना, ज्वारी, बाजरी, नाचणी या पौष्टिक धान्यांवर आधारित पदार्थांचा स्वीकार करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी गजानन महाराजांच्या जेवणाच्या’ ३२ पदार्थांच्या उल्लेख असलेल्या कवितेचे सादरीकरण केले. तसेच औरंगजेबाने शिवाजी महाराजांबद्दल केलेली प्रशंसा त्यांनी साभिनय उद्धृत करून उपस्थितांना भारावून सोडले.
महिला सक्षमीकरणाचा जागर – आर. विमला
याप्रसंगी प्रास्ताविक करताना निवासी आयुक्त तथा सचिव, आर. विमला यांनी महोत्सवाच्या आयोजनामागचा उद्देश स्पष्ट केला. त्या म्हणाल्या, “हा महोत्सव केवळ चवीचा उत्सव नाही, तर हा आमच्या मातीचा, शेतकऱ्यांचा, परंपरांचा आणि महिला सक्षमीकरणाचा उत्सव आहे. महिला बचत गटांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण आपल्या मातीशी जोडलेले अन्न खातो, तेव्हाच आपल्या भविष्याची ताकद आपल्यासोबत येते, असे प्रतिपादित करून स्थानिक खा, पौष्टिक जगा, मातीशी नातं जोडा, असे आवाहनही त्यांनी केले
विविधतेत एकता- सुशील गायकवाड
निवासी आयुक्त सुशील गायकवाड यांनी आपल्या मनोगतात ‘विविधतेत एकता’ या संकल्पनेवर जोर दिला. सर्व राज्यांना एकत्र बांधण्याची जी संकल्पना आहे, तिच खरी लोकशाही आहे आणि महाराष्ट्राचे हेच वैशिष्ट्य आहे. या महोत्सवामुळे दिल्लीकरांना महाराष्ट्राची एक वेगळी ओळख पाहायला मिळेल. खाद्य संस्कृती हा आपल्या मोठ्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्रातील काही खाद्यपदार्थांची परंपरा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे दिल्लीकरांनी या महोत्सवात येऊन महाराष्ट्राच्या या चविष्ट खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक श्री. प्रमोद कोलपते यांनी तर आभार प्रदर्शन महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल यांनी केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या खाद्य महोत्सवास पाठवलेल्या शुभेच्छांचे वाचन जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे यांनी केले. मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात महाराष्ट्र खाद्य महोत्सवामुळे नागपूरचा सावजी रस्सा, तर्री पोहा, पुणेरी मिसळ, वडापाव, मालवणी सी-फूड, कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, पुरणपोळी, वांग्याचे भरीत, शेवभाजी अशा स्वादिष्ट व्यंजनांचा अनुभव घेऊन दिल्लीकर निश्चितच आनंदित होतील. या महोत्सवात भारतीय खाद्य संस्कृतीची विविधता आणि त्यातील एकता प्रकर्षाने समोर येईल.
14 डिसेंबरपर्यंत होत असलेला हा महोत्सव दिल्लीतील नागरिकांना महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्य परंपरेचा अनुभव घेण्यासाठी एक उत्तम संधी असून, सर्व नागरिकांनी या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी केले आहे.