पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘स्वरस्वप्न’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम रविवार, १४ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात, सेनापती बापट रस्ता येथे रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, उपक्षेत्रीय कार्यालय, पुणे यांच्या वतीने हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
स्वप्ना दातार यांच्या संकल्पना आणि संयोजनातून साकारलेल्या या कार्यक्रमात बंदिशी, सिने संगीत आणि विविध रागरचनांच्या माध्यमातून सादर झालेल्या बहुरंगी संगीताने रसिकांना मंत्रमुग्ध केले. शास्त्रीय आणि लोकप्रिय संगीताचा सुंदर संगम साधणारे हे सादरीकरण संगीतप्रेमींसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरले.
कार्यक्रमात नमन नटवरा, भूप, रागमाला, टर्किश मार्च, सूरताल, भीमपलास, किरवाणी यांसह राम मेडली, देशभक्तीपर हिंदी गीतांची मालिका, अभंग मेडली आणि नाट्यसंगीत मेडली अशी विविधांगी सादरीकरणे सादर करण्यात आली. व्हायोलिनवर सिद्धी देशपांडे, रिया पितळे, अनुराग पाध्ये आणि वेधा पोळ यांनी सुरेल साथ दिली. व्हायोलावर आशिष बेहेरे, सेलोवर अपूर्व गोखले, तबल्यावर मनोज देशमुख, पखवाजावर भागवत चव्हाण आणि कीबोर्डवर सौरभ कान्हेकर यांनी उत्कृष्ट संगत केली. ध्वनियोजना नामदेव पांगारकर यांनी सांभाळली.
कार्यक्रमास सर्व रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश ठेवण्यात आला होता. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी उपस्थित कलाकारांचा सत्कार करून त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.संपूर्ण कार्यक्रमाने शास्त्रीय संगीताची गोडी, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक समृद्धी यांचे प्रभावी दर्शन घडवत रसिकांच्या मनात ‘स्वरस्वप्न’ची मधुर छाप उमटवली.