पुणे : महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल आयोजित 'एमईडीसी एमएसएमई कॅपॅसिटी बिल्डिंग समिट २०२५–२६ ' ही परिषद या वर्षी पुण्यात दि.१७ डिसेंबर रोजी ताज विवांता(हिंजवडी,पुणे )येथे होणार आहे. 'माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्यसेवा आणि जीसीसी क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योग नेते आणि धोरणकर्त्यांच्या उपस्थितीमुळे ही परिषद विशेष ठरणार आहे. महाराष्ट्राच्या वेगाने वाढणाऱ्या क्षमता इकोसिस्टममध्ये सहकार्य, ज्ञानविनिमय आणि नवोन्मेषाला चालना देणे हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे.हिंजवडी परिषदेने नवोन्मेषाला चालना मिळेल',असे महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष अतुल शिरोडकर यांनी पत्रकाद्वारे सांगितले.
सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होणाऱ्या उद्घाटन सत्रात पी. वेलारसु( मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी), डी.पी.नांबियार(नॅसकॉम पश्चिम विभाग अध्यक्ष),अतुल शिरोडकर(अध्यक्ष एमईडीसी), सचिन ईटकर(उपाध्यक्ष एमईडीसी), प्रदीप कोपर्डेकर( प्रादेशिक संचालक एमईडीसी), सुशील गायकवाड (कमिशनर, इन्व्हेस्टमेंट, राज्य सरकार ),डॉ.संग्रामसिंह पवार(संस्थापक, माइंडवर्क्स ग्लोबल टेक्नॉलॉजीज),सागर बाबर(अध्यक्ष ,कॉमसेन्स )आणि राजेश मुथा( चेअरमन, कृष्णा डायग्नॉस्टिक) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटनानंतर महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये 'कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या संधी 'या विषयावर मुख्य भाषण आयोजित केले आहे. त्यानंतर विविध देशांतून सहभागी होणाऱ्या तज्ज्ञांसह चार ज्ञानसमृद्ध सत्रे होणार आहेत. पहिले सत्र' एआय फॉर एमएसएमईज आणि जागतिक विस्तार 'या विषयावर असून त्यामध्ये सिंगापूर, जपान, इंग्लंड आणि जर्मनीतील उद्योगतज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
दुसरे सत्र 'जीसीसी, एआय, फिनटेक आणि हेल्थकेअरमधील आव्हाने आणि संधी 'या विषयावर असून उद्योगक्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक त्यात मार्गदर्शन करणार आहेत. दुपारनंतर तिसऱ्या सत्रात 'आरोग्यसेवेमधील एआय आणि तंत्रज्ञान 'या विषयावर चर्चा होणार असून यूएई, पुणे आणि देशातील आरोग्य सेवेत कार्यरत असलेले तज्ज्ञ सहभाग नोंदवतील. चौथे सत्र एआय, आयटी आणि हेल्थकेअर क्षेत्रातील क्षमता बांधणीवर आधारित आहे.समारोप सत्रात राजेश मुथा आणि डॉ. गिरीश देसाई उपस्थित राहणार आहेत. परिषदेचा समारोप हाय टी आणि नेटवर्किंगने होईल.