पुणे : विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे मावळ तालुक्यातील मौजे चांदखेड येथे आयोजित सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबीराचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता जगताप व सरपंच सौ. मीना दत्तात्रय माळी (पाटील) यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झाले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. नागेश भंडारी, प्रा. ज्ञानेश्वर जांभुळकर, प्रा.अनुपमा कदम, प्रा. सद्दाम हुसेन घाटवाले उपस्थित होते.
उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना सरपंच सौ. मीना दत्तात्रय माळी (पाटील) यांनी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे चांदखेड ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करत महाविद्यालयीन जीवनामधील आपले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडत यशस्वीतेच्या टिप्स दिल्या.
उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता जगताप यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित विशेष श्रम संस्कार शिबीराची संकल्पना व महत्त्व स्पष्ट करत शिबिर आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच या शिबिरामध्ये जीवन जगण्याचे विविध अनुभव विद्यार्थ्यांसमोर येत असतात असे नमूद करत शिबिरात आयोजित आदिवासी पाडा भेट व मोफत पुस्तक वाटप, फिरते ग्रंथालय, ग्राम सर्वेक्षण व ग्राम पंचायत सदस्य प्रशिक्षण अशा विविध उपक्रमांवर माहिती दिली.
या उद्घाटन समारंभाच्या यशस्वितेसाठी प्रा. काजल कांबळे, प्रा. प्रियांका महाजन, प्रा. शर्मिला देवकाते, प्रा. शैलेश सुरोशे, प्रा. प्रवीण खाडे, प्रणित पावले, संतोष कुंभार, निलेश शिंदे, सचिन शितोळे यांनी परिश्रम घेतले.