मुंबई: राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मात्र ही लढत मैत्रीपूर्ण असेल, असंही त्यांनी सांगितलं.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड संदर्भात अजितदादांशी चर्चा झाली आहे. “या दोन महापालिकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढल्यास त्याचा फायदा विरोधकांना होईल. त्यामुळे दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतला असून ही मैत्रीपूर्ण लढत असेल,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
राज्यातील इतर बहुतांश महापालिकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबईसह राज्यभरात महायुती सरकारने केलेल्या कामांच्या जोरावर जनतेचा कौल आमच्या बाजूने असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महापालिका निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशन पत्र स्वीकारणे: 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
अर्जांची छाननी: 31 डिसेंबर
उमेदवारी माघारीची अंतिम तारीख: 2 जानेवारी
चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी: 3 जानेवारी
मतदान: 15 जानेवारी
निकाल: 16 जानेवारी
दरम्यान, मतदारयादीतील घोळावरून विरोधकांनी उपस्थित केलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “थोड्याफार प्रमाणात मतदारयादीत त्रुटी असतात, त्या आम्हीही दाखवून दिल्या आहेत. मात्र यामुळे निवडणुका घेऊ नयेत हे चुकीचं आहे. येत्या काळात एसआयआर प्रक्रियेमुळे या त्रुटी कमी होतील. भविष्यात मतदारयादी ब्लॉकचेनवर आणल्यास सर्व घोळ संपेल.”राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.