धुळे : धुळे शहराला राज्यातच नव्हे, तर देशातील सुंदर, स्मार्ट व सुरक्षित शहर बनविण्याचा संकल्प पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आज व्यक्त केला. धुळे शहरातील विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.शहरातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळयास आमदार अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार, माजी महापौर प्रदीप कर्पे, चंद्रकांत सोनार, प्रतिभा चौधरी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री रावल म्हणाले की, सुमारे 30 हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळावर उभारण्यात येणाऱ्या भव्य व अत्याधुनिक ‘जयहिंद सिटी सेंटर मॉल’चे आज भूमिपूजन करण्यात आले आहे. या मॉलमध्ये मल्टिप्लेक्स थिएटर, सरकते जिने आदी आधुनिक सुविधा असणार असून मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे येथील मॉलप्रमाणेच धुळे शहरातही अत्याधुनिक मॉल उपलब्ध होणार आहे.
धुळे शहराचा स्मार्ट सिटी, सुंदर सिटी व सुरक्षित सिटी असा त्रिसूत्री आराखडा असून येत्या काळात शहराचा चेहरामोहरा पूर्णतः बदलणार आहे. अनेक राष्ट्रीय व राज्य महामार्गांमुळे धुळे शहरास दळण वळणाच्या दृष्टीने मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मनमाड–धुळे–इंदूर या 18 हजार कोटी रुपयांच्या रेल्वे मार्गाच्या कामास सुरुवात झाली असून पुढील चार-पाच वर्षांत बोरवेल, धुळे, सोनगीर, नरडाणा व शिरपूर रेल्वे स्थानकांना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. येथे लॉजिस्टिक्स ड्रायपोर्ट उभारण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
धुळे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करून भविष्यात बोईंग विमानांचे लँडिंग होऊ शकेल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अक्कलपाडा–धुळे या 170 कोटी रुपयांच्या पिण्याच्या पाण्याची योजना जवळपास पूर्ण झाली असून 750 कोटी रुपयांची भूमिगत गटार योजना कार्यान्वित आहे. 100 कोटी रुपये खर्चून डी.पी. रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली असून राजपथसारखा सुंदर पूल उभारण्याचाही संकल्प आहे.
धुळे जिल्हा सोलर हब म्हणून देशाच्या नकाशावर स्थान मिळवत असून सुलवाडे–जामफळ–कनोली उपसा सिंचन योजनेद्वारे दीड लाख एकर क्षेत्र बागायतीखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. रस्ते, पाणी, गटार व लाईट यांसारख्या मूलभूत सुविधा पुरविण्यास शासन कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री श्री. रावल यांनी सांगितले.
आमदार श्री. अग्रवाल म्हणाले की, पालकमंत्री श्री. रावल यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून शहराच्या विकासासाठी 50 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. भाजी विक्रेत्यांच्या पुनर्वसनासाठी दिलेला शब्द आज प्रत्यक्षात उतरवण्यात आला आहे. आज धुळे शहरात पालक मंत्री महोदयांच्या हस्ते 77 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी सरंक्षण राज्यमंत्री डॉ.भामरे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी देवपूर येथील मनपा मालकीच्या आरक्षित जागेवर कमर्शियल कॉम्प्लेक्स व भाजी मंडईचे बांधकाम करणे रु. 9 कोटी 99 लक्ष 99 हजार 611, धुळे शहरातील पांझरा नदीकाठी एकविरा देवी मंदिरा समोर पादचारी पूल, रस्त्यालगत दगडी घाटाचे बांधकाम, सुशोभिकरण, विद्युत रोषणाई, आदी कामे 10 कोटी 95 लक्ष 84 हजार 798, गणपती मंदिर ते संतोषी माता मंदिर रस्ता क्रॉकीटीकरण 1 कोटी 99 लक्ष 92 हजार 234, सिद्धेश्वर गणपती मंदिर ते स्वामी समर्थ मंदिर ते मोठा पूल, झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळ्यापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण रु. 5 कोटी 48 लक्ष 86 हजार 937 येथील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न् झाला.