मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 बाहेर सोमवारी (15 डिसेंबर) खळबळजनक घटना घडली. प्रकाश सावंत (वय अंदाजे 50) यांनी स्वतःवर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर न्यायालय परिसरात एकच गोंधळ उडाला.घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि सुरक्षारक्षकांनी तातडीने धाव घेत कोट तसेच पाणी मारून आग विझवली. गंभीर जखमी अवस्थेत प्रकाश सावंत यांना तातडीने मुंबईतील जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार सावंत हे सुमारे 50 ते 60 टक्के भाजल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
आर्थिक वादातून टोकाचे पाऊल?
मिळालेल्या माहितीनुसार, कोकणातील एका जागेच्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. संबंधित प्रकरणात प्रकाश सावंत यांनी एका वकिलाला एकूण 6 लाख 80 हजार रुपये दिले होते. यापैकी 6 लाख रुपये वकिलाने परत केले असून उर्वरित 80 हजार रुपये देण्यास वकिलाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सावंत यांनी केला होता. या आर्थिक वादातूनच सावंत यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच आझाद मैदान पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, न्यायालय परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली पुढील तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
