लातूर : लातूर जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक कोटी रुपयांच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचत एका निरपराध वृद्धाचा जिवंत जाळून खून केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी अवघ्या 24 तासांत हा गुन्हा उघड करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.औसा तांडा येथील रहिवासी गणेश चव्हाण हा एका खासगी फायनान्स कंपनीत कार्यरत होता. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज होते. आर्थिक अडचणींमधून सुटका मिळवण्यासाठी त्याने आधी एक कोटी रुपयांचा विमा उतरवला आणि नंतर स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला.
अपघात वाटणारी घटना ठरली खून
औसा तालुक्यातील वानवडा शिवारात मध्यरात्री स्कोडा कंपनीची चारचाकी गाडी अचानक पेट घेऊन जळून खाक झाली. गाडीतील चालकाचा होरपळून मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. मात्र तपासादरम्यान हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला.तपासात गणेश चव्हाण यांच्या कॉल डिटेल्समधून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. त्यानंतर गणेश चव्हाण जिवंत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने तुळजापूर टी-पॉईंट परिसरात लिफ्ट मागणाऱ्या गोविंद यादव (वृद्ध) यांना गाडीत बसवले. पुढे त्यांचा खून करून मृतदेह ड्रायव्हर सीटवर ठेवण्यात आला आणि गाडीला आग लावण्यात आली.स्वतःचाच मृत्यू दाखवण्यासाठी आरोपीने स्वतःचे कडे मृतदेहाजवळ ठेवले होते. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे