उरण : दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिवार दिनांक १३-१२-२०२५ रोजी यु. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ऍण्ड कॉमर्स ऍण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ऍण्ड टेक्नॉलॉजी मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या जोशपूर्ण वातावरणात साजरा झाला. क्रीडा महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून उरण पोलिस स्टेशनचे पोलिस इनस्पेक्टर संजय जोशी लाभले होते. यु. ई. एस. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठक्कर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठक्कर, उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर, सहसचिव ऍड. अपूर्वा ठाकूर, सदस्य व माजी अध्यक्ष आर्किटेक्ट तनसुख जैन यांचा स्कूल आणि ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या, माध्यमिक व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका तसेच सिनिअर कॉलेजच्या विभाग प्रमुख यांचा हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्यासोबत व्यासपीठावर समन्वयक, पूर्व प्राथमिक विभागातील पर्यवेक्षिका तसेच पीटीए मेंबर्स उपस्थित होते.
ह्या वार्षिक क्रिडा महोत्सवाच्या निमित्ताने, विदयार्थ्यांचे क्रीडागुण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते. ह्या सर्वांनी तसेच प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांनीही विदयार्थ्यांच्या क्रीडागुणांना भरभरुन दाद दिली. दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीही ज्युनिअर व सिनिअर कॉलेजच्या विदयार्थ्यांमध्ये शो मॅच कबड्डी सामना झाला, ज्यात ज्युनिअर कॉलेजच्या विदयार्थ्यांनी विजय मिळविला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, पोलिस इनस्पेक्टर संजय जोशी यांनी आपल्या भाषणातून शिक्षण, आरोग्य तसेच खेळाचे जीवनातील महत्व या विषयावर मार्गदर्शन केले व सर्व विजयी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले व क्रीडा महोत्सवाच्या सुरेख आयोजनाबद्दल सर्वांचे कौतुक केले. त्यानंतर यु. ई. एस. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठक्कर यांनीही सर्व विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
क्रीडा महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभात विजयी विदयार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदक व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. विजयी ठरलेल्या शिवनेरी हाऊसला प्रमुख पाहुणे तसेच यु. ई. एस. संस्थेचे अध्यक्ष ह्यांच्या हस्ते ढाल देऊन तसेच महिलांच्या व पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेतील विजयी संघालाही सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, स्वागत आणि आभार प्रदर्शन यु ई एस. परिवारातील शिक्षकांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. अशा रितीने यू. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ऍण्ड कॉमर्स ऍण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ऍण्ड टेक्नॉलॉजी मध्ये वार्षिक क्रिडा महोत्सव भव्यदिव्यपणे साजरा झाला.