पुणे : भोरगाव लेवा पाटीदार पंचायत (ठाया पाडळसे) अंतर्गत समुपदेशन समितीच्या पुणे शाखेचा उद्घाटन समारंभ शनिवार, दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी सेंट क्रीस्पिन्स होम, नळ स्टॉप, कर्वे रोड, पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.वैवाहिक जीवन यशस्वी होण्यासाठी युवक -युवतींना ही समिती समुपदेशन करून कार्यरत राहणार आहे.
या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक ललितकुमार पाटील, अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील आणि सचिव अॅडव्होकेट संजय राणे उपस्थित होते. डॉ. वर्षा पाटील, सुहास चौधरी आणि दिनकर फिरके यांची विशेष उपस्थिती लाभली.कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाने झाली. दीपप्रज्वलनानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रास्ताविक व समुपदेशन समिती, पुणे शाखेची माहिती पुणे शाखेचे प्रतिनिधी डॉ. संजय झोपे यांनी दिली.यानंतर समुपदेशन समिती पुणे शाखेने तयार केलेल्या “लग्न या विषयावर बोलू काही” या कार्यशाळेविषयी सौ. प्रतिभा राणे यांनी माहिती दिली. तसेच “लेवा विश्वम” या नियोजित ऑनलाइन डिरेक्टरीविषयी देवेंद्र भारंबे यांनी माहिती सादर केली. पुणे समितीच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकत समाजहितासाठी पुणे शाखेतर्फे राबविण्यात येणाऱ्या आगामी उपक्रमांची माहिती डॉ. संजय झोपे यांनी दिली.
यानंतर पुणे शाखेच्या कार्यशाळेचे आणि डिरेक्टरीचे औपचारिक उद्घाटन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात भोरगाव लेवा पंचायतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. समाजातील समुपदेशन, विवाहविषयक मार्गदर्शन, कुटुंबसंवाद आणि सामाजिक एकोपा यासाठी पुणे शाखा महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.उपस्थितांशी संवाद साधत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पुणे शाखेचे सर्व सदस्य, तसेच इतर मंडळांचे व शाखांचे पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.