बीड : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, कलाकेंद्रात नृत्याचे काम व पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून बारामती तालुक्यातील एका तरुणीला अंबाजोगाई येथे आणून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी एका महिलेसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.पीडित तरुणीला नृत्याची आवड असून, 24 एप्रिल 2025 रोजी अंबाजोगाई येथील बदामबाई गोकुळ या महिलेने पीडितेच्या आईशी संपर्क साधला. आपल्या ‘पायल कलाकेंद्र’मध्ये नृत्य करणाऱ्या मुलींची गरज असून, मुलीला नृत्य शिकता येईल आणि पैसेही मिळतील, असे आमिष तिने दाखवले. यावर विश्वास ठेवून पीडितेच्या आईने मुलीला अंबाजोगाईला पाठवले.
मात्र, कलाकेंद्रात पोहोचल्यानंतर पीडितेने तेथे राहण्यास नकार दिला. यानंतर बदामबाई गोकुळ व इतर दोघांनी तिच्याशी मारहाण केली आणि जबरदस्तीने अंबाजोगाई येथील एका लॉजवर नेले. तेथे बदामबाईने पीडितेला तीन पुरुषांच्या ताब्यात देऊन घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोप आहे.लॉजमध्ये उपस्थित असलेल्या मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीने पीडितेवर सामूहिक बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर तिला पुन्हा कलाकेंद्रात आणून सोडण्यात आले व वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या घटनेनंतर पीडितेने फोनद्वारे आईशी संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला. आईने तातडीने अंबाजोगाई गाठून मुलीची सुटका केली व तिला बारामतीला परत आणले. त्यानंतर बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.या तक्रारीवरून बदामबाई गोकुळ, मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपासासाठी हा गुन्हा अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.