मुंबई : सावरी गावातील शेडवर मुंबई पोलिसांच्या धाडीत 45 किलो ड्रग्ज सापडल्याची घटना समोर आली आहे. या ड्रग्जची बाजारपेठेतील किंमत अंदाजे 145 कोटी रुपये असल्याचा दावा आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात धक्कादायक आरोप केले आहेत.सुषमा अंधारेच्या मते, या शेडवर कारवाई करत असलेल्या तिघांना एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे यांच्या जावळी तालुक्यातील हॉटेल तेजयश मधून जेवण जात असल्याची माहिती आहे. प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत आणि त्यांनी 2017 साली ठाण्यातून नगरसेवकपदाची निवडणूक लढवली होती.
अंधारेंच्या आरोपानुसार, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी ही माहिती लपवून ठेवली. पोलिसांनी कारवाई केली असली तरी ड्रग्जशी संबंधित तिघांची नावे FIR मध्ये न दाखवल्याचा दावा त्यांनी केला. सुषमा अंधारे म्हणाल्या, “एखाद्या प्रकरणात मुलाचे नाव आले तर बापाचा राजीनामा मागितला जातो. तर ड्रग्ज प्रकरणात भावाचे नाव आल्यास एकनाथ शिंदे यांचाही राजीनामा हवा.”त्यांनी पुढे सांगितले, “हे प्रकरण उघडकीस आल्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सुरक्षेची हमी द्यावी. या विषयावर राजकारण बाजूला ठेवून ते माझ्या पाठीशी उभे राहतील अशी आशा आहे.”
प्रकरणाची सविस्तर माहिती
13 डिसेंबर रोजी सावरी गावात कारवाई झाली. सुरवातीला मुकंद गावात कारवाई झाली आणि त्याचे धागेदोरे पुण्यात आले. या तपासात विशाल मोरे याला ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरु आहे. तपासात सावरी गावातील शेडमध्ये 45 किलो ड्रग्ज सापडल्याची माहिती मिळाली.सुषमा अंधारे म्हणाल्या की, “शेडवर 75 लाख रुपये खर्च करून रस्ता तयार करण्यात आला आहे. येथे सात-आठ रूम बांधल्या गेल्या आहेत. याठिकाणी असलेली डस्टर गाडी आणि इतर सुविधा पाहता संशय वाढतो. हा रिसॉर्ट प्रकाश शिंदे यांच्याच मालकीचा आहे. शेडचा मालक गोविंद सिंदकर असून, त्याने सांगितले की चावी ओंकार दिघे याने घेतली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन का सोडले, हे अजून स्पष्ट नाही.”
स्थानिक लोकांच्या मते, शेडमध्ये राहणारे तीन लोक भारतीय नसावेत. त्यांच्या चेहऱ्याचा भेद स्पष्ट दिसत होता. हे लोक हॉटेल तेजयश मधून जेवण घेऊन जात असल्याचेही सांगितले गेले. या तिघांची नावे FIR मध्ये का नाहीत, अशी गंभीर शंका सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली.
राजकीय आणि प्रशासनिक प्रश्न
सुषमा अंधारे म्हणाल्या की, “रणजीत शिंदे हा एकनाथ शिंदे गटाचा तालुका प्रमुख आहे. प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे भाऊ आहेत. या प्रकरणात रणजीत शिंदे, प्रकाश शिंदे आणि संबंधित लोकांचा नेमका संबंध काय, हे तपासणे गरजेचे आहे. SP तुषार दोशी यांनी माहिती लपवली, त्यामुळे चौकशीत पारदर्शकता आवश्यक आहे.”ही घटना राज्यातील राजकीय आणि पोलीस यंत्रणेतील गंभीर प्रश्नांना उजागर करत आहे. पुढील तपास आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कारवाईवर सर्वांचे लक्ष लागले आहे.