ईश्वरपूर (जि. सांगली) : सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरमधून संतापजनक घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरमध्ये पोलिस रेकॉर्डवरील दोघा सराईत गुन्हेगारांनी तिचे अपहरण करत उसाच्या शेतात सामूहिक बलात्कार केला.अल्पवयीन मुलीच्या असाहाय्यतेचा गैरफायदा उठवत पोलिस रेकॉर्डवरील दोघा सराईत गुन्हेगारांनी तिचे अपहरण करत उसाच्या शेतात सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेनंतर नराधम पीडितेचे कपडे घेऊन पळून गेल्याने तिला विवस्त्र अवस्थेत शहरापर्यंत चालत यावं लागलं. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही नराधमांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने ईश्वरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋतिक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे (दोघे रा. खांबे मळा, कामेरी रस्ता, ईश्वरपूर) या दोघांविरुद्ध अपहरण, बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंद केला आहे. मंगळवारी रात्री ९च्या सुमारास ही घटना घडली.
आई घरी परतल्यानंतर उघडकीस आली घटना
पीडित अल्पवयीन मुलीची आई मंगळवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास कामावरून घरी आली. तेव्हा मुलगी घरी नव्हती, मुलीबद्दल तिने आजूबाजूला विचारपूस केली. रात्री उशिरापर्यंत मुलगी न सापडल्याने तिने पोलिसांना संपर्क साधला. काही वेळात पोलिस पीडित मुलीस घेऊन आले. आईने मुलीकडे विचारपूस केल्यावर ही घटना मुलीने सांगितली. तेव्हा मोठा धक्का बसला.
नागरिकांनी दाखवली माणुसकी
माणुसकीला काळिमा फासल्याची घटना घडल्यानंतर पीडित मुलगी ही घटना घडली त्या ठिकाणावरून जवळपास १ किलोमीटर अंतर रात्रीच्या अंधारात विवस्त्र अवस्थेत चालत आली होती. शहराच्या जवळच्या एका चौकात आल्यावर नागरिकांनी तिला कपडे दिले. तसेच पोलिसांना बोलावून पीडित मुलीस त्यांच्या हवाली केले. या घटनेनं संताप व्यक्त केला जात असून पिडीतेला न्याय मिळावा अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी व पीडितेला तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.